मुंबई : मनसेचा आज दि. 23 रोजी होणारा मुंबईतील (भांडुप) आणि उद्या दि. 24 रोजी होणारा पुण्यातील मेळावा अचानक रद्द करण्यात आला आहे. मनसेच्या ट्विटर हॅंडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. मेळावा रद्द करण्यामागचं कारण मनसेकडून देण्यात आलेलं नाही. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तब्येत ठिक नसल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच अध्यात्मिक गुरु कांचन गुरू मॉं आणि राज ठाकरे यांची भेट कृष्णकुंज येथे भेट झाली होती. हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी योगदान देण्याचं आवाहन कांचन गुरु मॉं यांनी केलं होतं. तसेच राज यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं होतं. त्यामुळे राज हिंदुत्वाकडे वळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे राज मेळाव्यात हिंदुत्वाची भूमिका जाहीर करतात का? याचीही उत्सुकता लागली होती.
अशातच मनसेच्या ट्विटर हॅंडलवरून मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवार 23 ऑक्टोरबर रोजी मुंबईत, तर 24 ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणारा शाखाअध्यक्षांचा मेळावा काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
पुढील मेळाव्याची तारीख, वेळ व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असं मनसेच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दोन्ही मेळाव्यांची तयारी पूर्ण झालेली असतानाच ऐनवेळी मेळावा रद्द करण्यात आल्याने मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. यामागे वेगळे काही कारण तर नाही ना, याचाही अंदाज केला जात आहे.
दरम्यान, 23 तारखेला होणाऱ्या मेळाव्यात राज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. हिंदूत्व, भाजपबरोबरची युती, महापालिका निवडणुकीतील रणनीती आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरे काय भाष्य करणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. या मेळाव्यात राज यांच्या रडारवर कोण असेल याबाबतही सर्वांची उत्सुकता लागली होती. मात्र, ऐनवेळी मेळावा रद्द झाल्याने सर्वच प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत.