मुंबई – मराठी भाषा, मराठी बाणा आणि मराठी अस्मितेची धुरा खांद्यावर घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता इंडीयन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचे धावते समालोचनही मराठीत हवे आहे. जगातील मोठी ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉनला दणका दिल्यानंतर मनसेने आता आपला मोर्चा आयपीएल 2020 कडे वळविला आहे.
डिस्ने हॉटस्टारवर भारतातील अन्य भाषांमध्ये आयपीएलचे समालोचन केले जाते. यामुळे मराठीतूनही समालोचन केले जावे, यासाठी मनसेने आता थेट डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवले आहे. मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी डिस्ने हॉटस्टार कंपनीला यासंदर्भात एक पत्र पाठवले आहे.
डिस्ने हॉटस्टारच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अन्य प्रादेशिक भाषांसारखाच मराठी भाषेचाही पर्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. आयपीएलचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये केले जाते. मात्र, या ऍपमध्ये मराठी नाही. तुमच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे.
आयपीएलचा मराठी प्रेक्षक वर्गही मोठा आहे. शिवाय आयपीएलमध्ये अनेक मराठी खेळाडूही खेळाची शान उंचावत आहेत. असे असताना तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे, असे मनसेने म्हटले आहे. याबाबतचे ट्विट नाईक यांनी केले आहे.
आधी ई-कॉमर्स कंपन्यांना दिलाय दणका…
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मोर्चा ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला होता. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं ऍप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता.
चित्रे यांनी ऍमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात ई-मेल पाठवला होता. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांच्या वतीने ऍमेझॉन.इनच्या जनसंपर्क विभागाने त्याला आता प्रतिसाद दिला आहे. बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. ऍमेझॉन ऍपमधील त्रुटींमुळे आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
संबंधित विभागाला तुमच्या तक्रारीबद्दल कळवण्यात आलं असून लवकरच त्यावर कार्यवाही केली जाईल, असं ऍमेझॉनने स्पष्ट केलं आहे. एकप्रकारे हा मनसेचा विजय मानला जात आहे. आता डिस्ने हॉटस्टार काय भूमिका घेतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.