बॉलीवुडमध्ये भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायॉपिकची चर्चा काही महिन्यांपासून होत आहे. यात सायना नेहवालची भूमिका अभिनेत्री परिणीति चोप्रा साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंगही सुरू करण्यात आले असून यात मानव कौल हा सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंदच्या भूमिकेत दिसणार आहे.
मानव कौलने सोशल मीडियावर या चित्रपटातील आपला फर्स्ट लुक शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “सायना नेहवालच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेतील माझा पहिला लुक, तसेच सायनाची भूमिका साकारण्यासाठी परिणीति चोप्रा खूपच कठोर मेहनत घेत आहे.’
दरम्यान, सायना नेहवालच्या या बायॉपिकचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करत आहे. या चित्रपटात प्रथम सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार होती. परंतु डेंगू झाल्यानंतर श्रद्धाने या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर या भूमिकेसाठी परिणीतिची निवड करण्यात आली. सध्या चित्रपटाचे शुटिंग सुरू असून यावेळी परिणीति जखमी झाली होती. त्यानंतर शूटिंगला काही दिवसांसाठी ब्रेक देण्यात आला आहे.