शाहूपुरीमध्ये युवकाची गोळी झाडून आत्महत्या

सातारा  – थोरल्या भावासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून संतोष जयसिंग शिंदे (वय 36, रा. शाहूपुरी, शिवाजीनगर, सातारा) या युवकाने पिस्तुलातून स्वत:च्या डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शाहूपुरीतील भररस्त्यात सोमवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष शिंदे आणि त्यांचा थोरला भाऊ गणपत जयसिंग शिंदे (वय 46) यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे. हा वाद न्यायप्रविष्ट आहे.

या दाव्याची न्यायालयात सोमवारी तारीख होती. याच कारणावरून दोघा भावांमध्ये सोमवारी सकाळी पुन्हा वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर संतोष शिंदे यांनी संतापाच्या भरात स्वत:जवळ असलेल्या पिस्तुलातून डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केली. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने शाहूपुरी परिसरात खळबळ उडाली.

संतोष शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. काहींनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर संतोष शिंदे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. संतोष शिंदे हे मुंबईत रियल इस्टेटचा व्यवसाय करत होते. त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना होता की नाही, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. यासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी संतोष यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गणपत शिंदे याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे या घटनेचा अधिक तपशील मिळू शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.