women’s day special : गृहिणींचा ‘करोना’शी लढा…

लढा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर साधारणपणे तलवार, ढाल असेच काहीसे येते. पण प्रत्येक ठिकाणी कुठलंही शस्त्रच वापरून लढाई लढायची नसते. प्रत्येक लढाई ही मैदानावरचीही नसते. ही आजची लढाई आहे सध्या उभ्या ठाकलेल्या करोना नामक शत्रूशी. आपल्या देशाने, राज्याने, जिल्हा, गाव, गल्ली आणि घर, अगदी घरातील प्रत्येक माणसाने सकारात्मक भावना व योग्य ती खबरदारी घेऊन लढायची आणि जिंकायची अशी ही लढाई आहे.

ह्या लढाईत सरकारने ठोस पावले उचलत, जनतेच्या भल्यासाठी जाहीर केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन प्रत्येकालाच कठीण जाणारा असाच आहे. यात सर्वात जास्त त्रास होणार आहे तो घरातील गृहिणीला. ह्या लॉकडाऊनमुळे जरी दिवसातील काही काळ गरजेच्या वस्तूंसाठी दुकाने, डेअरी, मेडिकल या सेवा उपलब्ध असल्या तरीही एक जागरूक नागरिक म्हणून उगाचच घराबाहेर पडून रोज भाजी, रोज दूध आणायला जाणारी माणसं कमीच, कारण ह्यात प्रत्येकालाच ह्या विषाणूच्या संक्रमणाचा धोका कळलेला आहे. सगळीच माणसे घरात 24 तास असणार, म्हणजे चार वेळा काहीतरी खायला लागणारच, कारण आपला प्राण अन्नमय आहे.

पूर्वी जवळजवळ प्रत्येक घराघरात वर्षभर पुरेल इतके धान्य आणि इतर वस्तूंची साठवण केली जायची. घरातील स्त्रियांचा हा दूरदृष्टिकोन खरंच वाखाणण्याजोगा होता. उन्हाळ्यात पापड, कुरडया, लोणची, मसाले, भाजण्या असे पदार्थ केले जायचे. तसं म्हंटल तर स्त्रीचा ह्या सगळ्या गोष्टी करण्यातच दिवस संपून जायचा. पण ह्या गोष्टीत त्यांना आनंद आणि समाधान असायचे.

हीच परंपरा जपत अजूनही मी आणि माझ्या वयाच्या इतर स्त्रिया अजूनही वर्षभरासाठी अगदी सगळेच नाही तरी, निदान गहू, तांदूळ आणि डाळ असे जिन्नस साठवून ठेवतातच. मी माझ्या आईकडून ह्या सर्व चांगल्या सवयींचा वारसा घेऊनच सासरी आले. माझ्या सासूबाईसुद्धा याच विचारांच्या असल्याने या काळात आम्हाला खूप काळजीने ग्रासले नाही.

भाजी नाही मिळाली तर किंवा हिरवीच पालेभाजी हवी असा हट्ट न धरता घरात साठवलेली कडधान्ये जसे मूग, मटकी, चवळी, हरभरा, मसूर हे आमच्याकडे आहेच; किंवा साधारण सर्व घरात असतेच, त्यात आंब्याचे, लिंबाचे लोणचे, लसूण चटणी, कडीपत्त्याची चटणी हे पर्याय पोळीच्या सोबतीला उपलब्ध असतात. घरात ज्वारी, नाचणी, तांदूळ, भाजणी असतेच. आवळ्याच्या सिझनमध्ये मोरावळा असतो.

जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला, तेव्हा दोन महिन्यांचे सामान आम्ही भरून ठेवले. आमच्या गावात तर पूर्ण चार दिवस संपूर्ण 100% बंद घोषित करण्यात आला तेव्हा दूधसुद्धा मिळाले नाही. मग आम्ही दूध पावडरचा चहा केला.

प्रत्येक घरातील स्त्री ही सजग असेल तरच हे संकट तिला फार मोठे वाटणार नाही आणि ह्या सगळ्यात तिला घरच्यांचा असलेला पाठिंबा महत्त्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीचा हट्ट नसावा. प्रत्येक परिस्थितीत गृहिणीला घर आणि घरातील माणसांना सांभाळणे यायलाच हवे आणि तरच ती हसत खेळत कुठल्याही संकटाशी दोन हात करू शकते. पण या काळात हातावर पोट असणाऱ्यांचे सर्वात जास्त हाल होत आहेत. रोजंदारीवर काम करणारी माणसे फार विचित्र परिस्थितीतून जात आहेत.

काही सामाजिक संस्था किंवा सरकारी यंत्रणा त्यांना मदत करीत आहेत. पण कुठवर? माहीत नाही. याचे उत्तर आपल्यापाशीच आहे. आपण जागरूक राहून दिलेल्या नियमांचे उल्लंघन न करता घरातच राहून पोलीस, डॉक्‍टर व सरकार यांना सहाय्य केले तर हे संकट जरूर दूर होईल, ही मला तरी खात्री आहे.

– मानसी चापेकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.