आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्वोत्तम संस्काराचे धडे मिळणे आवश्यक आहेत. यातूनच चांगला माणूस घडविण्यास निश्चित मदत होणार आहे. या दृष्टीने शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर प्रगती इंग्लिश मीडियम स्कूलने भर दिलेला आहे. यश मिळविण्याकडे वाटचाल करण्याकरीता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अभिनव उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. त्याविषयी…
मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा ध्यास बाळगत वर्ष 2002 मध्ये स्व. कृष्णराव माने विद्या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. त्यांनतर धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे 2002 मध्ये या प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष पोपटराव माने, उपाध्यक्ष दादासाहेब बोबडे, सचिव किशोर माने, मुख्याध्यापिका प्रिती माने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपड करत आहेत.
अगदी सुरुवातीला दहा बाय दहाच्या एकाच खोलीत राहून उरलेल्या तीन खोल्यांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यावेळी 30 विद्यार्थी संख्या होती. आता इयत्ता दहावीपर्यंत वर्ग सुरू असून सुमारे 1 हजार 950 पर्यंत विद्यार्थी संख्या पोहचली आहे. विनाअनुदानित तत्वावर शाळा चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. शिक्षण घेण्याची आस असलेल्या पण फी भरण्याची परिस्थिती नसलेल्या दहा गरीब मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीचा अवलंबही केला आहे.
विद्यार्थ्यांना शेतीबाबातही माहिती मिळावी याकरिता प्रदर्शनांना भेटी दिल्या जातात. शिक्षण, कला, क्रीडा यात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमधील उत्साहात सतत वाढच होत आहे. शिक्षकांच्या प्रामाणिक कष्टावरच शाळेची प्रगती अवलंबून असते. यादृष्टीने शिक्षकांना उत्तम काम करण्याचे प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष उपक्रम घेण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात येते. शिक्षकांचा परफॉर्मन्स तपासण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतींचा अवलंब केला जातो. शिक्षकांची उपस्थिती, शिकविण्याची पद्धत, कामातील नियमितता, विद्यार्थ्यांवरील नियंत्रणाची पध्दत, कृतीच्या माध्यमातून शिक्षण अशा विषयाद्वारे शिक्षकांना काही टार्गेट देऊन त्यातून मिळण्याऱ्या गुणांनुसार त्यांना दरवर्षी वेतनवाढ देण्यात येते. याबरोबरच फ्रीज, मायक्रोवेव्ह, प्रिंटर, फूड प्रोसेसर, कुलर, ओव्हन, व्हॅक्युम क्लिनर, साड्या, पैठणी यासारख्या वस्तुंच्या स्वरुपात आकर्षक बक्षिसेही मिळविण्याची संधीही त्यांना उपलब्ध करुन दिली जाते. या उपक्रमाद्वारे शिक्षकांमध्ये अधिकाधिक उत्कृष्ट काम करण्याची शक्ती जागृत होत असल्याचे चित्रही आढळून आले आहे, असे शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिती माने यांनी स्पष्ट केले आहे.
शाळेत विद्यार्थ्यांना गरजेनुसार सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. ग्रंथालयाची सुसज्ज सेवाही पुरविण्यात येते. संपूर्ण शाळेच्या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. गेट पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात येते. पालक-शिक्षक संघ, स्टुडंट कौन्सिल, सुरक्षा यासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांच्या नियमित बैठका घेण्यात घेऊन अडीअडचणी जाणून त्या सोडविल्या जातात.
विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक समस्यांचीही माहिती घेऊन शक्य त्या पध्दतीने सहकार्य करण्याची भूमिका राबविण्यात येते. समाजातील अपप्रवृत्तीपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी समुपदेशन करण्यात येते.
शासनाने शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य द्यावे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शाळेत 50 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन शिक्षण देण्यात येते. मात्र गेल्या चार वर्षापासून शासनाकडे शुल्क प्रतिपूर्तीचे लाखो रुपये थकले आहेत. ही रक्कम शासनाकडून तात्काळ मिळणे अपेक्षित आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या शिक्षणाबाबात शाळांमध्ये सक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
– किशोर माने, सचिव, स्व. कृष्णराव माने विद्या प्रतिष्ठान
आमच्या शाळेत पाच मूल्यांना महत्त्व आहे. टीमवर्क,आदर, सुसंवाद, जबाबदारी, काळजी या पाच मूल्यांनाच आधारभूत मानत शाळेने यशाच्या शिखराकडे वाटचाल करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरील आवश्यक त्या गोष्टींची माहिती व्हावी यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येतात. विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देऊम त्यांच्या कामगिरीचा गौरवही करण्यात येतो.
– प्रिती माने,
मुख्याध्यापिका, प्रगती इंग्लिश मिडीयम स्कूल
आधुनिक शिक्षणसाधने आणि सर्वांगिण विकास…
1. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ई-लर्निंग, एज्यु कॉम, एलसीडी प्रोजेक्टरसह इतर अनेक आधुनिक पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे.
2. प्रयोगात्मक शिक्षण पद्धतीही या शाळेत वापरात आणली असल्याने सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी शिक्षकांकडून प्राधान्य दिले जाते.
3. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला, पेन्टींग, फन-फेअर, क्कीज अशा स्पर्धा घेतल्या जातात. तसेच संगीत, नृत्य, नाट्यगुणांचे दर्शन वार्षिक सेक्हसंमेलनात घडते
4. विविध विषयांवर वाद-विवाद स्पर्धाही घेण्यात येतात. कल्पनाशक्तीला वाव मिळण्यासाठी प्रकल्प सादरीकरण व प्रदर्शन भरविण्यात येते
5. शिक्षणाबरोबर खेळाचे महत्वही पटवून दिले जाते. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जातात. स्पीड बॉल, बुद्धिबळ, टेबल टेनिस, कॅरम, योग अशा उप्रकमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच समाजातील महत्वाच्या बाबींची माहितीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाते. यासाठी शैक्षणिक सहली काढल्या जातात. पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जातात.