सातारा, (प्रतिनिधी)- माणूस पैशाच्या, सत्तेच्या हव्यासात गुरफटत चालल्याने समाजातील माणूसपण हरवत चालले आहे. पालकांनी समृद्ध आणि सुदृढ नवी पिढी घडविण्यासाठी काम केले पाहिजे. अन्यथा, भविष्यात फारच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे.
विपरीत परिस्थितीवर मात करणारेच यशस्वी होतील, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केला. येथील भारती फाउंडेशन, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय आयोजित करिअरच्या वाटेवरील तरुण व पालकांची कर्तव्ये या विषयावर ते बोलत होते.
यावेळी माजी आयकर अधिकारी जयवंत चव्हाण, उद्योजक संजय निकम, ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती- झुटिंग, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कार्यवाह शशिभूषण जाधव, प्रा. श्रीधर साळुंखे उपस्थित होते. ध्येयनिश्चितीसाठी परिश्रम आणि जगातील प्रेरणादायी व्यक्तींचा सहवास लाभणे आवश्यक आहे.
ज्यांना का जगायचे, कसे जगायचे हे कळले, की आयुष्याचा मार्ग सुकर होतो. जी व्यक्ती विपरीत परिस्थितीत स्वतःला सिद्ध करू शकते, तीच आयुष्यात यशस्वी होते. मागील काही वर्षांत भय, सामाजिक तिस्काराची भावना वाढीस लागली आहे.
त्यामुळे पालकांनी मुलांच्या मनामध्ये स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी त्यांची बलस्थाने, दुर्बल स्थाने ओळखून त्याप्रमाणे करिअर निवडण्यासाठी सहकार्य करावे. त्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.
भारती फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र भारती- झुटिंग यांनी प्रास्ताविक केले. शिवानी भारती यांनी सूत्रसंचालन केले. अश्वमेध ग्रंथालय अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांनी आभार मानले. ग्रंथालयाचे कार्यवाह शशीभूषण जाधव, डी. एम. मोहिते, केदार खैर, गौरव इमडे, पोपटराव मोरे, आनंदा ननावरे, गौतम भोसले, मदन देशपांडे, विजयकुमार क्षीरसागर तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.