#प्रभात_दीपोत्सव_२०२० : माणसातील माणूस

– प्रकाश निर्मळ


कोल्हापूरला गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे ही, आकाशवाणी कोल्हापूरला कथाकथनाचे निमंत्रण होते; त्यानुसार कथाकथन आटोपून जवळच्याच नृसिंहवाडीला जायचे ठरवले होते होते. लहानपणापासूनच घरी दत्त भक्‍तीचे संस्कार… आर. एन. पराडकर यांनी गायलेली गाणी नागपूर आकाशवाणीवर नेहमी ऐकू येत असत. घरी दत्ताच्या गाण्यांचे पुस्तकही आणले होते बाबांनी. दर गुरुवारी आई मला ती गाणी म्हणायला लावत असे. घरी तबला-पेटी नव्हती; पण लोखंडाच्या खुर्चीवर बसून तिचाच ठेका धरण्यासाठी वापर करीत असे. 

कधी कधी दत्ताचे पारायणही करीत असे. त्यावेळी तीन दिवसांत सगळे म्हणजे 52 अध्याय पूर्ण करीत असे. या पारायण काळात दररोज सुंदर सुंदर फुलांच्या वेगवेगळ्या माळा चढवणे, रोज वेगवेगळ्या सुगंधाच्या अगरबत्त्या लावणं, आरत्या म्हणणे, गायन करणे आणि वेगवेगळा प्रसाद चढवणे आणि भक्षण ही करणे यामुळे मनाला एक वेगळीच प्रसन्नता अनुभवायला मिळत असे.

लहानपणी कुठलंही संकट आलं की “दत्त दत्त दत्त’ असा धावा करावा म्हणजे ते ते संकट दूर होतं आणि बरेचदा कुत्री मागे लागली की, परीक्षेत उत्तर आठवत नसलं की आणि शिक्षकांचा मार वाचवायचा असला की, मी हा धावा करीत असे. त्याचे निश्‍चित फळ मिळतं, असा दृढ विश्‍वास मला होता. नोकरीतील पहिले पोस्टिंगसुद्धा दत्ताच्या कारंजा जवळचे शहर असलेल्या वाशीमला मिळालं. साहजिकच वारंवारच्या कारंजा भेटीमुळे दत्तात्रेयावरची माझी श्रद्धा अधिक गाढ होत गेली किंवा ती श्रद्धा ठेवल्याने लाभत असलेल्या प्रसन्नतेमुळे तरुण वयातही त्यात बदल झाला नाही, असे म्हणता येईल.

कोल्हापूरच्या एसटी स्टॅन्डवर गेलो आणि नरसोबाच्या वाडीला जाणाऱ्या बसमध्ये बसलो. “कुठे निघालात?’ माझ्या शेजारी बसलेल्या सह प्रवाशाने विचारले. “नरसोबाच्या वाडीला’ मी उत्तरलो.

“खूप जागृत देवस्थान आहे!’ तो म्हणाला आणि न थांबता सांगू लागला… “याला दत्तप्रभूची राजधानी म्हणतात. नृसिंह सरस्वतींनी इथं 12 वर्षे तपश्‍चर्या केली. सात नद्यांचा संगम आहे इथे! भाविकांचा खूप आवडता परिसर आहे हा…’
“हो, म्हणूनच तर कोल्हापूरला आल्या आल्या पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीला आलोय!’
“अच्छा! तरीच तुमची भाषा वेगळी वाटली… तुम्ही पुण्याचे का?’
“हो, पण मूळ विदर्भातला!’
“ते गजानन महाराजांचे शेगाव तिकडेच आहे ना?”
“हो हो…’ मी म्हणालो.

थोड्या वेळात गाडीची महिला कंडक्‍टर, हातातली पंचिंग मशीन टपाला वाजवत आमच्याकडे आली. मी तिच्याकडून नरसोबाच्या वाडीचे तिकीट घेतले. पण घेताना चार वेळा आमची चुकामूक झाली. एखाद्या वांड मुलाने किंवा वारा प्यालेल्या वासराने उड्या मारत बेभानपणे धावावे तसे हेलकावे घेत, धक्‍के मारत ती बस धावत होती. त्या धक्‍क्‍यांनी आमच्या डोक्‍याची आणि बसच्या टपाची बरेचदा गाठ भेट होता होता वाचली!

ही कंडक्‍टर मंडळी एवढ्या धक्‍क्‍यामधून स्वतःची “कण्डक्‍ट’ कशी काय नीट ठेवू शकते याचं मला खूप आश्‍चर्य वाटलं त्या धक्‍क्‍यांनी आणि खडखड आवाजाने आमचा संवाद मध्येच तुटत होता; पण तरीही एखाद्या मार्केटिंगवाल्या माणसासारखा तो मनुष्य बोलण्याचा प्रयत्न करीत होता.
“बाकी कसे काय वाटले कोल्हापूर?’ त्याने पुन्हा संवाद सुरू केला. “छान! छानच आहे. ऐतिहासिक ठिकाण आहे; त्यामुळे कोल्हापुराबद्दल आमच्या मनात कायम आदराचं स्थान आहे.
देवीला जाऊन आलात की नाही?’

“नाही अजून…’ “जाऊन या. जुनं मंदिर आहे.’ “तुम्ही नेहमीच जाता का नृसिंहवाडीला?’ “हो तर! मी रहिवासीच आहे तिथला!’ “लग्नापासून 10 दहा वर्षे मला मूलबाळ झालं नाही. खूप खूप उपाय केले. सगळ्या टेस्ट नॉर्मल! पण काय व्हायचं माहीत नाही; वयाची बत्तीशी ओलांडली तरी मूल नाही. आई-वडील म्हणत होते, दुसरं लग्न कर म्हणून. पण मी काही ऐकलं नाही. मग एक दिवस नृसिंह सरस्वती माझ्या स्वप्नात आले. म्हणाले, पारायण कर. मी दोन-तीन महिने खूप कठोर पारायणे केली. पारायण सुरू असताना हप्ताभर अनवाणी चाललो, भूमी शयन केलं, स्त्री संग टाळला, फक्‍त पांढरी वस्त्रे घातली, बेल्ट लावला नाही वगैरे वगैरे… तुम्हाला नवल वाटेल मला याच पत्नीकडून पाच मुलं झाली.” 

“पाच?’ मी मनातल्या मनात ओरडलो.
“मी आता दरवर्षी पारायण करतो.’ तो म्हणाला.
“खरंच प्रभूंची लीला अगाध आहे.’ मी म्हणालो.
मीही मग त्याला माझा एक अनुभव सांगितला.

एकदा दत्त जयंती सप्ताहाच्या निमित्ताने गुरूचरित्राचे पारायण करित होतो. एकावन्नाव्या अध्यायात नृसिंह सरस्वती शेवंतीची फुले प्रसाद पुष्प म्हणून पाठवतात असा उल्लेख आहे. मी त्यावेळी नेमका एकावन्नावा अध्यायच वाचत होतो. त्यातील प्रसाद पुष्पाचा उल्लेख असलेली ओळ आली. त्याबरोबर टेबलावर ठेवलेल्या मोबाइलची रिंग वाजली. ते व्हायब्रेशन देवघराच्यावर टांगलेल्या दत्ताच्या प्रतिमेपर्यंत पोचले असावे. तत्काळ प्रतिमेवरील शेवंतीचे फूल ढळले आणि नेमके देवघरासमोरील प्रसादाच्या वाटीत पडले. पोथी वाचून झाल्यावर मी मोबाइलमध्ये बघितले, तर तो कंपनीच्या जाहिरातीचा संगणकीय कॉल होता…

मी ही घटना त्याला सांगितली तेव्हा तो खूपच खूश झाला आणि दत्तप्रभू व नृसिंहवाडी याबद्दल खूप भारावून सांगू लागला. कारंजा ते कर्दळीवन आणि श्रीपाद श्रीवल्लभ ते स्वामी समर्थ असा मोठा प्रवास त्याने मला घडवला. दरम्यान, त्याने या मंदिराबाबतचा इतिहास सांगताना एक किस्सा सांगितला तो फारच रंजक होता:

विजापूरच्या आदिलशहाच्या मुलीची दृष्टी गेली, ती परत यावी म्हणून त्याने अनेक उपाय केले, शेवटी या मंदिरात आला. प्रार्थना केली. नवस बोलला, आणि आश्‍चर्य म्हणजे कालांतराने तिची दृष्टी परत आली… तो खूप आनंदी होऊन इथे आला, आणि त्याने नवस बोलला त्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम करून दिले!
हा किस्सा किती खरा, किती काल्पनिक ते देवाला माहीत. पण विजापूरच्या आदिलशहाचा उल्लेख निघाल्याबरोबर माझ्या मनात जुन्या राम मंदिर आंदोलनाच्या काळातील हिंदू-मुस्लीम दंगलीची आठवण ताजी झाली.

मी त्याला विचारले, “कोल्हापुरात दंगल वगैरे नाही होत कधी?’
“नाही, मुळीच नाही! हिंदू-मुस्लीम गोडीगुलाबीने राहतात!’ तो म्हणाला.
“मुस्लीम किती टक्‍के असतील?’
“असतील, सात-आठ टक्‍के!’
“कट्टर आहेत?’

“नाही. ओळखूसुद्धा येत नाहीत! बायका घालतात बुरखा वगैरे, पण माणसं इतर धर्मीयांसारखीच राहतात. मराठीतच बोलतात. हिंदू जसे मुस्लिमांच्या दर्ग्यात जातात तसे इकडचे काही मुस्लीमही मंदिरात जातात. जत्रेत, सणात, उत्सवात सर्वत्र सहभागी होतात.’

मला वाटलं हा भंपक माणूस असावा. उगाच धर्मनिरपेक्षतेची पाठराखण करण्याच्या नादात मुस्लिमांच्या लिबरल रूपाचे स्वप्न रंजन माझ्यापुढे मांडू पाहत आहे. मुस्लीम धर्म हा तर जगातला सर्वाधिक कट्टर धर्म आहे असे मी समजत आलो. जिथे मुस्लीम बहुसंख्येने असतात तिथे ते आपलं स्वतंत्र इस्लामिक स्टेट बनवू बघतात, सेक्‍युलॅरिझम ही हिंदूंची प्रकृती आहे. मुस्लिमांची नव्हे… वगैरे वगैरे बरेच टिपीकल गर्व से कहो धाटणीचे विचार माझ्या डोक्‍यात घोळू लागले होते.

“माझा विश्‍वास नाही बसत. पूर्वी खेड्यापाड्यांतून असं चित्र होतं, नाही असं नाही; पण बाबरी विध्वंसानंतर आता कुणीच मुस्लीम असा राहिलेला नाही.’ मी म्हणालो, त्यावर तो हसला. “बाबरी विध्वंसाशी इथल्या मुस्लिमांना काहीच देणेघेणे नाही. तो राजकारणी लोकांचा विषय आहे. राजकारणी लोक मतांचं राजकारण करतात, पण त्यांच्या राजकारणासाठी आपण आपल्यात फूट कशाला पाडायची?’

“तेच, तेच तर म्हणतो ना… मुसलमानांना हे कळले पाहिजे ना! ते तर आपल्या धर्मालाच चिकटून राहतात! आता त्या बाबराने बांधलेली मशीद, त्याचा भारतीय मुस्लिमांशी काय संबंध? राम त्यांचाही पूर्वज होता ना… मग का मंदिर बांधायला विरोध करीत होते ते?’
मी अक्षरश: ओरडत आणि त्याच्या मांडीवर थाप देत म्हणालो. माझ्याकडे रोखून बघत तो मला म्हणाला, “साहेब मी तुम्हाला कोण वाटतो?’
असाल एखाद्या दिखावू धर्मनिरपेक्षतावादी पक्षाचे कार्यकर्ते… निदान तुमच्या गोष्टींवरून तरी असंच वाटतंय!

“पक्ष नाही, माझा धर्म कोणता असावा?’
अर्थातच हिंदू मी उत्तरलो. “चूक!’ तो म्हणाला.
मी विचारले, “मग?’
“मी मुस्लीम आहे!’ तो शांतपणे म्हणाला.
“काय?’ असं म्हणत मी अक्षरश: उडालोच. यावेळी मात्र माझी आणि बसच्या टपाची बहुप्रतीक्षित गाठ भेट झाली.

तो मुस्लीम होता आणि मी त्याच्या समुदायाबद्दल कडवट बोलत होतो. एकीकडे माझा विश्‍वास बसत नव्हता आणि दुसरीकडे हे जर खरं असेल तर या नवख्या ठिकाणी हा मुस्लीम माणूस आपल्या इतर सोबत्यांना बोलावून माझं काही बरं वाईट तर करणार नाही ना, अशी भीती मला वाटू लागली. मला माझ्या मित्रांनी सांगितलेले बरेच खरे खोटे किस्से मग ओळीने आठवू लागले. त्यातील एका मित्राने सांगितलेला किस्सा तर मला प्रकर्षाने आठवला.

कॉलेजमध्ये आमच्या त्या मित्रासोबत शिकत असलेला त्यांच्या ग्रुपमध्ये नेहमी मिसळणारा एक मित्र शब्बीर आणि आमचा तो मित्र त्यांच्या एका सोबत्याकडे जेवायला गेले होते. रूमवर आल्यावर हा गडी जोडे काढून आला; पण पायमोजे काढायला टाळाटाळ करीत होता. सोबत्यांनी फारच आग्रह केला तेव्हा त्याने मोठ्या मुश्‍किलीने ते काढले खरे, पण तो ते काढत असताना त्या सर्वांना जे दिसले ते धक्‍कादायक होते. त्याने आपल्या पायमोज्यांमध्ये एक रामपुरी चाकू लपवलेला होता!

मी जरी नवीन कॉलनीत राहत असलो तरी तो परिसर जुन्या वस्ती जवळच आहे. या जुन्या वस्तीत बरेच गुंड लोक आहेत. नाही म्हटले तरी त्यांच्याशी संबंध येतोच. चुकून काही मॅटर झालेच तर आत्मसंरक्षणासाठी असावे म्हणून ठेवलेय, बाकी काही नाही! हे त्याने दिलेले स्पष्टीकरण होते.

हा किस्सा आठवला आणि माझी नजर त्या शेजाऱ्याच्या पायाकडे गेली त्याने चप्पल घातलेली बघून मी एक लांब सुस्कारा सोडला, आणि सावरत बोललो,
“काय थट्टा करता राव?’
“थट्टा नाही, खरे बोलतोय. तुम्हाला पुरावा देऊ?’
तो हसत बोलला. मी आता आणखीच घाबरलो. हा आपली सुन्नत झाल्याचा पुरावा दाखवतो की काय असे वाटून गेले!

ती समोर ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेली बुरखेवाली बाई आहे ना, तीच आमची बेगम आणि ती बघा माझी तीन मुले. दोन मोठी आहेत म्हणून घरी ठेवून आलोय! आता पटली का खात्री?
मला क्षणभर काय बोलावं तेच सुचेना! टेपरेकॉर्डरमधली कॅसेट पुन्हा मागे नेऊन ऐकावी तसे मी माझे संवाद पुन्हा पुन्हा आठवू लागलो आणि आपण काही आक्षेपार्ह तर बोललो नाही ना याची पडताळणी करत राहिलो.

“साहेब, प्रत्येक जाती धर्मात चांगली आणि वाईट दोन्ही प्रकारची माणसं असतात. चार वाईट माणसं दिसली म्हणून सगळी जमात वाईट होत नाही. तुमच्या धर्मातही अनेक कट्टर विचाराचे लोक आहेत. अनेक जातीयवादी लोक आहेत. आपलीच जात श्रेष्ठ इतरांची कनिष्ठ असे समजणारे केवळ आपल्याच जातीच्या लोकांना फेवर करणारे, इतरांवर अन्याय करणारे लोक आहेत. पण अशा चार जातीयवादी माणसांमुळे ती संपूर्ण जात वाईट होत नसते. कोणत्याही जाती धर्माबाबत असे विचार बाळगणे भारत मातेला आवडत नाही, एवढे लक्षात ठेवा. त्याचा थांबा आला आणि तो उतरला.

मी गप्प झालो. किती मोठा धडा देऊन गेला हा! एखाद्या जाती किंवा धर्मातील सरसकट सगळ्याच लोकांना एकाच पारड्यात तोलणं खरंच किती योग्य आहे? चांगल्या वाईट प्रवृत्ती प्रत्येकच समूहात असतात. आपण मात्र एक दोन वाईट अनुभवांवरून त्या संपूर्ण जातीबद्दल आपले मत बनवीत असतो. मी विचारमग्न झालो.

देवदर्शनापूर्वी मला एका माणसाचे दर्शन झाले होते. मी मनोमन त्या माणसातील माणसाला साष्टांग नमस्कार केला आणि आपल्या प्रवासाला लागलो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.