माण-खटाव दुष्काळात होरपळतंय 

चारा छावण्याचे 11 प्रस्ताव कसेबसे मंजूर

म्हसवड  – पाच महिने दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या माणवासियांनी स्वत:सह जनावरांचीही तहान टॅंकरच्या तुटपुंज्या पाण्यावर भागवली खरी, पण चारा कोठून आणणार असा गंभीर प्रश्‍न दुष्काळग्रस्त माण-खटाव तालुक्‍यातील सर्वसामान्य जनतेपुढे उभा राहिला आहे. शेतातच चारा नाही तर जनावरांना कोठून घालायचा, त्यातच चाऱ्याचे गगनाला भिडलेले दर, मोकळे खिसे, चारा छावणीची मागणी करुनही सुरु होत नसल्याने दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत असल्याने माण-खटाववासिय दुष्काळाच्या चटक्‍यांनी चांगलेच होरपळून निघत आहेत.

जानेवारी महिन्यात छावण्या सुरु करण्यास मंजुरी मिळाली, प्रस्ताव पाठवून दोन महिने झाले तरीही अधिकाऱ्यांना बळीराजाबद्दल आत्मयिता वाटत नव्हती, “छावण्याची तारीख पे तारीख’ या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याने तडकाफडकी माणमधील 80 छावण्या सुरु करण्याच्या प्रस्तावातील 11 प्रस्ताव कसेबसे मंजुर करण्यात आले.

गत दोन वर्षांपासून माण तालुक्‍यातील गावात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कसा बसा चारा पुरवला. मात्र जानेवारीपासून बोडक्‍या रानात कुसळावर शेळ्या मेंढ्यासह मोठी जनावरे जगवली तर काही कसाबाच्या दावणीला गेली माणदेशी फौंडेशनच्या चेतना सिन्हा व विजय सिंन्हा यांनी बजाज कंपनीच्या सहाय्याने म्हसवड येथे जनावराची छावणी सुरु केली. मात्र शासन छावण्या सुरु करण्यास अटीवर अटी घालत असल्याने छावण्या सुरु करत नव्हते. अखेर मंत्रालयात झालेल्या 24 जानेवारीच्या बैठकीत दुष्काळी भागात आवश्‍यकतेनुसार छावण्याचे प्रस्ताव घेऊन छावण्या सुरु करण्याचा आदेश महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवल्यानंतर प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी प्रांताधिकारी यांना छावण्याचे प्रस्ताव घेऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे माणच्या विविध गावातुन 80 प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे जमा झाल्यावर 10 फेब्रुवारी रोजी सर्व प्रस्ताव पाठवले. मात्र छावणी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिने हेलपाटे मारुनही छावण्याचे प्रस्ताव मंजूर होत नव्हते.

मार्च महिन्यात विविध दैनिकांत जिल्हाधिकारी छावण्या सुरू करण्याची तारीख पे तारीख या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध होताच तातडीने माण तालुक्‍यातील भालवडी- आबासाहेब पोळ शेती पतसंस्था मार्डी, भाटकी-श्रीगुरुदत्त सहकारी संस्था पिपरी, शेनवड -शेनवडी विकास सोसायटी माळवाडी -(वरकुटे म्हसवड) पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान डोंबवली, आंधळी-बलंवत फांऊंडेशन दहिवडी, मोगराळे-मोगराळे विकास सोसायटी, बिजवडी- बिजवडी विकास सोसायटी, वडगाव-माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सुत गिरणी वडुज, हवलदारवाडी – ज्योतिलींग मजूर सहकारी संस्था राजवडी, अनुभुलेवाडी- श्रमसंस्कार सोसल फांऊंडेशन दहिवडी, जाधववाडी – ओम आगाशीव शेती पतसंस्था मलकापूर, ता कराड या संस्थाना छावण्या सुरू करण्यापूर्वी पाण्याची सोय आहे का, कडबा कुट्टी मशीन आहे का, जनावरांना निवारा आहे का आदी नियमावली पूर्ण करुनच छावण्या सुरू कराव्या असे सांगण्यात आल्याने छावण्या मंजूर झालेल्या संस्था पुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तर ज्यांच्या छावण्या मंजुर झाल्या नाहीत त्याच्या छावण्याचे प्रस्ताव लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्याल्यातून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.