अभिनेता शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. गेल्या आठवड्यात वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करत शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
यावेळी आरोपीने ५० लाखांची खंडणीही मागितली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुंबई पोलीसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रायपूरला रवाना झाले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीबाबतीची अधिकची कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याची धमकी
शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी येण्यापूर्वी अभिनेता सलमान खानला देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात २४ ऑक्टोबर रोजी बिश्नोई टोळीच्या नावाखाली सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून अटक केली होती. या आरोपीने सलमानकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
या सर्व घडामोडींनंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही अभिनेत्यांची सुरक्षा वाढवली आहे. एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या
१२ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर सातत्याने अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात आता शाहरुख खानलाही जीवे मारण्याची धमकी आल्याने बॉलिवूड विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.