नोएडा : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा झीशान आणि अभिनेता सलमान खानला धमकावणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिसांनी नोएडा येथून अटक केली आहे. मोहम्मद तय्यब (20) असे त्याचे नाव आहे. एसीपी नोएडा प्रवीण कुमार सिंह म्हणाले- आरोपींना सूरजपूर न्यायालयात हजर केले जाईल. तेथून मुंबई पोलीस त्याला ट्रान्झिट रिमांडवर घेणार आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद तय्यब हा मूळचा बरेली, यूपीचा रहिवासी आहे. सध्या तो दिल्लीतील ज्योती नगर येथे आपल्या मामाकडे राहत होता. वडिलांचे नाव ताहिर आहे. ते बरेलीमध्ये टेलरिंगचे काम करतात. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. त्याची पडताळणी केली जात आहे. 25 ऑक्टोबरला संध्याकाळी झीशान सिद्दिकी यांच्या वांद्रे कार्यालयात हा धमकीचा संदेश मिळाला. यामध्ये सलमान खान आणि झीशान यांना खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. झीशानच्या एका कर्मचाऱ्याने पोलिसांत एफआयआर दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी मोहम्मद तय्यब या धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली.
मुंबई पोलिसांचे एक पथक आरोपीच्या दिल्लीतील घरी हजर आहे. ज्योतीनगर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर आरोपीच्या मामाच्या घराचीही झडती घेण्यात येत आहे. आतापर्यंतच्या तपासात आरोपीचा कोणत्याही गँगशी संबंध नसल्याचे समोर आले आहे. त्याने सलमान खानला का दिली धमकी? याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. चौकशीदरम्यान त्याने सलमान आणि झीशानला धमकी दिल्याची कबुली मात्र दिली आहे.