नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत शस्त्रे आणि दारूगोळ्याची अवैध विक्री करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या शिक्षकाला अटक करण्यात आली. तो महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नक्षलवाद्यांनाही शस्त्रे आणि दारूगोळा पुरवत होता.
बिहारचा रहिवासी असणारा रामकृष्ण सिंह उर्फ मास्टर दिल्लीतील गुन्हेगारांना शस्त्रे देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे दिल्ली पोलिसांनी सापळा रचून 58 वर्षीय सिंहला पकडले.
त्याच्याकडून पाच पिस्तूल आणि दोनशे जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. बिहारमधील काही खासगी शाळांमध्ये सिंह याने शिक्षक म्हणून सेवा केली. तो 2015 मध्ये एका गुन्हेगाराच्या संपर्कात आला. त्यानंतर पैसे कमावण्यासाठी त्याने अवैध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विक्री सुरू केली. सुरूवातीला तो बिहारमध्येच सक्रिय होता. नंतर त्याने महाराष्ट्र, ओडिशा, दिल्लीकडेही मोर्चा वळवला. महाराष्ट्राच्या गडचिरोलीत सक्रिय असणाऱ्या नक्षलवाद्यांनाही त्याने शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवल्याची माहिती समोर आली. त्याच्या अटकेमुळे शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याच्या अवैध विक्रीत सामील असणारे व्यापक जाळे उघड होण्याची शक्यता आहे.