मुंबई : राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि भाजप असा सामना रंगला असल्याचे दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे.कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर टीका करत मनसेचाही समाचार घेतला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत खोचक शब्दांत टोला लगावला होता. त्यावरून आता मनसेने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी खोचक ट्वीट केले आहे. “आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाणे मनपात सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला”, अशी आठवण गजानन काळेंनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे.
“मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू”, असं या ट्वीटमध्ये शेवटी गजानन काळेंनी म्हटल आहे.
आदित्य ठाकरेसाठी वरळीत मनसे उमेदवार न देता राजसाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला.
२०१२ ला एकनाथ शिंदेनी राजसाहेबांची भेट घेतली असता ठाणे मनपात सेनेच्या महापौरसाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला.
मुन्नाभाईच काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील.
गेट वेल सून मामू— Gajanan Kale (@GajananKaleMNS) September 23, 2022
दरम्यान, “आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गृहमंत्री आहेतच. आपले गद्दार आहेतच. मुन्नाभाईही आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत”, असं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटनेता मेळाव्यात बोलले होते. यावरून आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे.