कोलकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. एक्सपायरी बाबू आणि एक्सपायरी पीएम अशा शब्दांत ममतांनी मोदींचा उल्लेख केला.
ममता या पश्चिम बंगालच्या विकासाच्या मार्गातील स्पीडब्रेकर आहेत, अशी टीका मोदींनी त्या राज्यातील सभांमध्ये केली. त्या टीकेचा समाचार ममतांनी एका सभेत घेतला. देशातील जनतेच्या कल्याणासाठी मोदी सरकारने काय केले, असा सवाल करत ममतांनी मोदींना जाहीर सभेत किंवा दूरचित्रवाणीवर थेट चर्चेचे आव्हान दिले. 56 इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान खोट्याचा आधार घेतात. मात्र, मी मोदी नसल्याने खोटे बोलत नाही, असे त्या म्हणाल्या. केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यास भाजप राज्यघटनेत बदल करेल. देशात लोकशाही अस्तित्वात राहणार नाही. अर्थात, हवाई हल्ल्याबाबत बोलणारे मोदी आता मतदारांचा हल्ला अनुभवतील, असे ममतांनी पुढे बोलताना म्हटले. मोदी आणि ममतांमधील शाब्दिक युद्धामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.