नवी दिल्ली – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ममता बॅनर्जी 30 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. प. बंगालच्या निवडणुकीत बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांनी एका पायानेच प. बंगालमध्ये भाजपला पराभूत करेन आणि दोन्ही पायांनी 2024च्या लोकसभेत पराभूत करेन असे आव्हान दिले होते. त्यामुळे त्या विरोधकांच्या ऐक्याची मोट बांधत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसांतील भेटीगाठींवरून स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्र दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत ममता बॅनर्जी महाराष्ट्रात असतील. आपल्या दिल्ली दौऱ्यात कॉंग्रेसमधील काही नाराज नेत्यांना ममता बॅनर्जी यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये आणले.
भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचीही ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. स्वामी हे भाजपमधील असंतुष्ट आणि भाजप नेतृत्वावर थेट टीका करण्यासाठी ओळखले जातात. बुधवारी या दोन्ही नेत्यांची दिल्लीस्थित साऊथ एव्हेन्यूमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली.
या भेटीनंतर, आपला तृणमूल कॉंग्रेसमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी स्पष्ट केले. यानंतर ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशातील वाराणसीचा दौराही करणार आहेत.