कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचा (सप) प्रचार करणार आहेत. ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसने याआधीच उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा आणि सपला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सपचे ज्येष्ठ नेते किरण्मय नंदा यांनी मंगळवारी येथे ममतांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सपच्या प्रचारात ममता सहभागी होणार असल्याची माहिती दिली. ममता फेब्रुवारीत उत्तरप्रदेशचा दौरा करतील.
त्यावेळी त्या सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या समवेत व्हर्च्युअल सभा घेतील. त्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदाही होतील. बंगालमध्ये मागील वर्षी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत सपने तृणमूलला पाठिंबा जाहीर केला.
आता तृणमूलने उत्तरप्रदेशात सपला पाठिंबा दिला आहे. ममतांच्या सहभागामुळे सपच्या प्रचारात आणखी रंग भरण्याची चिन्हे आहेत. उत्तरप्रदेशातील सत्तारूढ भाजपचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून सपकडे पाहिले जात आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यांत मतदान होईल.