नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशातील सर्वांत कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यावरून ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ममतांची कथा सामान्य नाही, असे म्हणत त्यांनी मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केली.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने नुकताच एक अहवाल जाहीर केला. त्यामध्ये देशातील विद्यमान ३१ मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती देण्यात आली. त्यानुसार, आंध्रप्रदेशची धुरा सांभाळणारे एन.चंद्राबाबू नायडू सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या नावे तब्बल 931 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर, ममतांच्या नावे अवघी १५ लाख रूपयांची संपत्ती असल्याचे समोर आले.
राजकीय व्यक्ती (महिला असो की पुरूष) आर्थिकदृष्ट्या संपन्नच असते, असा समज एव्हाना रूढ झाला आहे. साहजिकच, ममतांकडे असणाऱ्या अल्पशा संपत्तीकडे कौतुकास्पद बाब म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. तेच ओब्रायन यांच्या प्रतिक्रियेतून अधोरेखित झाले. भारतीय आणि आशियाई मापदंडांचा विचार करता ममतांचे जीवन केवळ अनुकरणीय नाही.
तर, त्यांच्या रेकॉर्डशी बरोबरी जगातील कुठलाच जनसेवक करू शकत नाही. कोलकत्यातील एका साध्या घरातून ममतांनी नि:स्वार्थ जनसेवा सुरू केली आणि अतिशय करूणाभावाने त्या सेवेचे संगोपन केले. तसे १०० वर्षांतून एखादवेळीच घडते, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.