ममता बॅनर्जींकडून हिंदूंना चुचकारण्याचे प्रयत्न

कोलकाता – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील 8 हजार गरीब सनातन ब्राह्मण पंडितांना दरमहा 1 हजार रुपयांचा भत्ता आणि मोफत घराची घोषणा केली आहे. पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून ममता बॅनर्जींनी हिंदूंना चुचकारण्याचे हे प्रयत्न सुरू केले आहेत. 

‘पश्‍चिम बंगालमधील सनातन ब्राह्मणांना पौरोहित्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी कोलघाट येथे जमीन यापूर्वीच देण्यात आली आहे. अनेक पंडित गरीब आणि आर्थिकदृष्ट्या हालाखीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे यांना दरमहा 1 हजार रुपयांचा भत्ता आणि राज्य सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत मोफत घर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.’ असे बॅनर्जी यांनी सांगितले.

हिंदी दिवसानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देताना ममता बॅनर्जी यांनी आपले सरकार सर्व भाषांना समान आदर देत असल्याचे आणि कोणत्याही भाषेबद्दल दुजाभावाची वागणूक देत नसल्याचे सांगितले.

हिंदी भाषेचा प्रसार करण्यासाठी हिंदी अकादमी सुरू करण्याचा आणि दलित साहित्य अकादमी सुरू करण्याचा निर्णयही आपण घेतला असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.