भाजपचं स्वप्न भंगलं; पोटनिवडणुकीत ममतांचा दणदणीत विजय; मुख्यमंत्रीपद कायम

कोलकाता – पश्चिम बंगालमधील महत्वाच्या अशा भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय झाला आहे. भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. आज मतमोजणी होती. सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे. या विजयामुळे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद ममता बॅनर्जी यांच्याकडे कायम राहणार आहे.

तृणमूल नेत्यांचा दावा खरा ठरला –

तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 50 हजारपेक्षा जास्त मतांनी जिंकणार असा दावा केला होता. हा दावा खरा ठरला आहे. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. 30 सप्टेंबरच्या पोटनिवडणुकीत केवळ 57.09 टक्के मतदान झाले. तर 26 एप्रिल रोजी चट्टोपाध्याय यांनी लढवलेल्या निवडणूकीत हा आकडा 61.79 टक्के होता. चट्टोपाध्याय 28 हजार 719 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.