ममता बॅनर्जींचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

कोलकाता  – लोकसभा निवडणुकीत अपेक्षेइतके यश मिळाले नाही त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रिपदी राहायचे नाही. असे सांगत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला आहे.

लोकसभेच्या एकूण 42 जागांपैकी 18 जागा भाजपला मिळाल्या तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसला 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 2014 पेक्षा 12 जागा तृणमूलला कमी मिळाल्या. भाजपने गेल्या निवडणुकीत फक्त 2 जागा मिळवल्या होत्या. त्यांनी मुसंडी मारत ममतांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू होती. आता निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जिव्हारी लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत ममता बॅनर्जींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी पश्‍चिम बंगालवर जम बसवला होता. मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. पश्‍चिम बंगाल सरकारचा 2021 सालापर्यंत कालावधी आहे. तरीही त्यांच्या राजीनामाच्या इच्छेमुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×