Mamata Banerjee : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच पश्चिम बंगालमधील (Mamata Banerjee) हाय-प्रोफाइल भवानीपूर मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष पुनरिक्षण प्रक्रियेनंतर शनिवारी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीतून तब्बल ४७,०९४ मतदारांची नावे वगळण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा हा हक्काचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या बदलांचा थेट परिणाम आगामी निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण कोलकातामधील भवानीपूर मतदारसंघात नोव्हेंबर २०२५ मध्ये जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा एकूण २,०६,२९५ मतदार होते. मात्र, त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या पहिल्या मसुद्यात ४४,७८६ नावे बाद करण्यात आली होती. Mamata Banerjee शनिवारी आलेल्या अंतिम अहवालात आणखी २,३२४ नावांची भर पडल्याने एकूण वगळण्यात आलेल्या मतदारांचा आकडा ४७ हजारांच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी २०२१ च्या पोटनिवडणुकीत ज्या ५८,००० मताधिक्याने विजय मिळवला होता, त्या तुलनेत ही घटलेली मतदार संख्या अत्यंत निर्णायक ठरू शकते. याव्यतिरिक्त, सुमारे १४,१५४ मतदारांची नावे सध्या अधिनिर्णय प्रवर्गात ठेवण्यात आली आहेत. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी अद्याप सुरू असून, जर ही नावेदेखील बाद झाली, तर भवानीपूरच्या मतदारांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळेल. निवडणूक आयोगाच्या या पावलामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आतापासूनच शाब्दिक युद्ध रंगात आले आहे. (Mamata Banerjee) भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी या प्रक्रियेचे स्वागत करताना म्हटले आहे की, ही नावे दुबार मतदार किंवा मृत व्यक्तींची होती. ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भवानीपूरमधून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने याला भाजपचे राजकीय कारस्थान असल्याचे म्हटले आहे.