कुचबिहार गोळीबार प्रकरण | हा तर CISFचा नरसंहार; ममता बॅनर्जी यांचा पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल

कोलकाता – कुचबिहार जिल्ह्यात मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआयएसएफ) पथकाने नरसंहारच केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज केला. मतदानाच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या हिंसाचारात पाच जण मरण पावले. त्यात सीआयएसएफने केलेल्या गोळीबारात चार जण मरण पावले. त्याच्या दुसऱ्या दिवशी ममता बोलत होत्या.

हे नरसंहाराशिवाय दुसरे काहीच नाही. नागरिकांच्या छातीत गोळ्या घुसल्या आहेत. जर त्यांना जमावाला पांगवायचे असते तर त्यांनी नागरिकांच्या पायात गोळ्या झाडल्या असत्या, असे बॅनर्जी म्हणाल्या. सिलीगुडी येथे त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

निवडणूक आयोगाने सितालकुचीला राजकारण्यांनी 72 तास भेट देण्यास बंदी घातली आहे. त्यावर टिकेची झोड उठवताना त्या म्हणाल्या, हा हुकुमनामा केवळ मी या शूरांच्या कुटुंबियांची भेट घेऊ नये, म्हणून काढला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा संपर्क साधला आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, केवळ मला रोखण्यासाठी असे आदेश काढणे दुर्देवी आहे.

मात्र, हा 72 तासांचा कालावधी लोटल्यानंतर मी तेथे निश्‍चित जाईन. माझ्या निवडणूक निधीतून जेवढी शक्‍य होईल तेवढी मदत मी त्या कुटुंबियांना करेन. ममता यांनी शनिवारी ट्‌विटरचा आधार घेत निवडणूक आयोगावर टीका केली होती.

निवडणूक आयोगाचे ( इसी) नाव बदलून आता मोदी आचार संहिता (एमसीसी) ठेवायला हवे. भाजप त्यांची सर्व शस्त्रे वापरू देत पण मला माझ्या माणसांना भेटण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यांच्या वेदना मला जाणून घेण्यापासून अडवू शकत नाही. कुचबिहार मधील माझ्या बंधू भगिनींना भेटण्यापासून तुम्ही तीन दिवस रोखाल पण चौथ्या दिवशी मी तेथेच असेन, असे त्यात म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.