दिल्ली वार्ता | या चिमण्यांनो परत फिरा रे…!

वंदना बर्वे

प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तृणमूल कॉंग्रेसमधून फुटून अनेक नेते भाजपाच्या गोटात सामील झाले. भाजपाचा विजय झाल्यास आपले मंत्रिपद ठरलेले आहे, अशा भ्रमात ही नेतेमंडळी होती. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे अनेक नेते घरवापसीच्या तयारीत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्याबाबत थोडक्‍यात आढावा…

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल यायला जेमतेम पंधरा दिवस झालेत. मात्र, आयातीत भाजप नेत्यांना श्‍वासाचा त्रास जाणवू लागला आहे. निवडणुकीपूर्वी तृणमूल कॉंग्रेसच्या ज्या नेत्यांना पक्षात श्‍वसनाचा त्रास होत होता त्या नेत्यांना हवापालट करूनही काही उपयोग झालेला नाही. यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झालाच तर माजी केंद्रीय मंत्री दिनेश त्रिवेदी आणि मुकुल रॉय यांचा करावा लागेल.

भाजपच्या विजयी आमदारांची पहिली बैठक बोलाविण्यात आली. भाजपचे नवनियुक्‍त आमदार मुकुल रॉय यांनी या पहिल्याच बैठकीला दांडी मारली. अध्यक्षस्थानी भाजपाध्यक्ष दिलीप घोष होते. नॉर्थ कृष्णानगर या मतदारसंघात काही हिंसा झाल्यामुळे मुकुल रॉय यांना जावे लागल्याचे अध्यक्षांना सांगावे लागले.

खरं सांगायचं म्हणजे, दिलीप घोष आणि मुकुल रॉय यांचं सुरुवातीपासून पटत नाही असं म्हणतात. यामुळे अध्यक्षांनी आमदारांच्या बैठकीत काय सांगितलं याची रॉय यांना अजिबात पर्वा नाही. त्याचं कारणही तसंच आहे. दिदीच्या शपथविधी समारंभात रॉय तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बख्शी यांच्याशी गप्पा मारताना दिसले.

मुळात, विधानसभा निवडणुकीच्या काळात घोष यांनी शुभेंदु अधिकारी यांना जास्त महत्त्व दिल्यामुळे मुकुल रॉय नाराज असल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर, निवडणुकीच्या प्रचारकार्यातही त्यांना कोणतेही महत्त्वाचे कार्य देण्यात आले नव्हते. जेव्हा की, 2018 च्या पंचायत निवडणुकीत आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना प्रचार समितीत महत्त्वाचे स्थान दिले होते.

बंगालची निवडणूक सांप्रदायिक विभाजन करून जिंकली नाही जाऊ शकत, असं रॉय यांनी एकदा भाजप नेत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले गेले. एवढेच काय तर, यंदाची निवडणूकसुद्धा त्यांना लढवायची नव्हती अशी चर्चा आहे. ते तृणमूल कॉंग्रेसमध्ये होते तोपर्यंत त्यांनी “मास्टरमाइंड’ची भूमिका निभावली. 

ममता बॅनर्जी यांनीसुद्धा या निवडणुकीत त्यांच्यावर थेट निशाणा साधण्याचे टाळले. शपथविधी समारंभात भाजपऐवजी तृकॉं अध्यक्षांशी गळ्यात हात घालून बोलणे आणि भाजप आमदारांच्या पहिल्याच बैठकीला दांडी मारणे भविष्यातील वाटचालीकडे इशारा करणारे नाही ना? मुकुल रॉय समर्थक आमदारांसह तृणमूलमध्ये जाणार की काय, अशी चर्चा आतापासून सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या या नेतेमंडळींची स्थिती “या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी झाली आहे.

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांच्या स्वप्नांवर विरजण सोडले आहे. भाजपला एकहाती सत्ता मिळाली की आपले मंत्रिपद नक्‍की, असे समजून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते; परंतु दिदींच्या लाटेमुळे सर्वांचे स्वप्न हवेत विरले.

माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी सध्या अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. मुळात ते गुजरातचे आहेत; परंतु डंका वाजविला तो प. बंगालमध्ये. येथेच ते स्थायिक झाले आणि राजकारणात स्वतःची जागा निर्माण केली. त्यांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्यांना राजकारणाने जेव्हा जेव्हा संधी दिली त्यांनी पक्ष बदलला आणि निष्ठासुद्धा.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल कॉंग्रेसमध्ये आता आपला श्‍वास गुदमरू लागला आहे, असं सांगून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तेव्हा त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपायला आणखी साडेपाच वर्षांचा कालावधी शेष होता. दिदी आता माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना त्यांच्या जागी राज्यसभेवर पाठविण्याची तयारी करीत आहेत. राज्यसभेत भाजपची झोप उडविणे हा त्यामागचा हेतू. भाजपने प. बंगालची सत्ता एकहाती मिळविल्यानंतर आपण तृणमूल कॉंग्रेस का सोडली? आता किती मोकळं मोकळं वाटते आहे हे जनतेला सांगू अशी त्रिवेदी यांची इच्छा होती. मात्र, “करू गेलं काय आणि उलटे झाले पाय’ अशी अवस्था झाली.

भाजपने त्रिवेदी यांना केंद्रात मंत्री बनविण्याचा शब्द दिला होता असे त्रिवेदी यांच्या एका निकटवर्तीयांचं म्हणणे आहे. कारण, त्यांचे संघातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र, आता परिस्थिती पार बदलली आहे. त्रिवेदी यांनी एखाद्या राज्याचे राज्यपाल होऊन जावे, असे भाजपला वाटू लागले आहे. कारण, त्यांना केंद्रात मंत्री तेव्हाच बनविता येऊ शकते जेव्हा त्यांना राज्यसभेवर पाठविता येईल आणि आता पुढील वर्षापर्यंत राज्यसभेची कोणतीही जागा रिक्‍त होणार नाही आहे. 

भाजपने आपल्याला उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार बनवावे, अशी त्रिवेदी यांची मनोमन इच्छा आहे. परंतु, भाजपात कुणाला काहीही वाटो होणार तेच जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटणार!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.