अल्पवयीन विवाहित भाचीच्या मदतीला मामा आले धावून…

शिक्रापुरात गुन्हा दाखल करून तपास उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग

शिक्रापूर – कासारी (ता. शिरूर) येथे कामानिमित्ताने राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या बारा वर्षीय मुलीचे लग्न 25 वर्षीय मुलाशी उस्मानाबाद येथील महादेव मंदिरात लावून दिल्याची घटना घडली. या मुलीच्या मामाने नवविवाहित मुला-मुलीच्या आईवडिलांसह अल्पवयीन मुलीच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मुलीचे मामा विनोद भीमराव कोरडे (रा. गौर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे वडील हनुमंत जनार्दन कदम व आई सविता हनुमंत कदम (दोघे रा. नारी, ता. बार्शी जि. सोलापूर; सध्या रा. कासारी, ता. शिरूर) व नवविवाहित मुलगा प्रवीण लहू मते, मुलाचे वडील लहू रामा मते, आई मंगल लहू मते (तिघे रा. दहिफळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

कासारी येथे कामानिमित्त राहणारे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत कदम व सविता कदम यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झाली होती. जुलैच्या अखेरीस हनुमंत कदम व सविता कदम या मुलीच्या आई वडिलांनी प्रवीण मते यांचे आई वडील लहू मते व मंगल मते यांच्याशी चर्चा करून मुलगी प्रियांका ही बारा वर्षाची असल्याचे माहीत असताना तिचे लग्न प्रवीणसोबत ठरविले. त्याप्रमाणे कळंब (जि. उस्मानाबाद) येथील महादेव मंदिरात दोघांचे लग्न त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांना न सांगता लावून दिले. त्यांनतर काही दिवसातच नवविवाहित प्रवीण व प्रियांका हे मुलीचे आई-वडील राहत असलेल्या कासारी (ता. शिरूर) येथे राहण्यास आले. याकाळात प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना काही पैसे उसने दिले होते. त्यामुळे प्रवीण याने प्रियांका हिस तिच्या आई वडिलांना उसने पैसे दिल्याच्या कारणावरून मारहाण केली. त्यामुळे प्रियांका हिने तिच्या मामांना फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी प्रियांका हिचे मामा विनोद कोरडे यांनी शिक्रापूर येथे पोलिसांना हकीगत सांगितली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी कासारी येथे मुलीसह तिची आई व पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अधिक तपासासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.