सातारा – कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक लागली असून या गटामध्ये जुने आणि जाणते नेतृत्व असलेले मालोजी शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कुडाळ गटातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शिंदे यांना निवडून आणले पाहिजे आणि यासाठी माझा मोलीजी शिंदे यांना पाठिंबा आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले असून भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कुडाळ गटातील मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने मालोजी शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मालोजी शिंदे यांनी कै. लालसिंगराव शिंदे यांच्यासारख्या कणखर आणि समाजाभिमुख नेतृत्वासोबत काम केले आहे. मालोजी शिंदे अनेक वर्षांपासून कुडाळ गटातील जनतेसाठी कार्यरत असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जवळून पाहिलेला आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर असलेला एक सर्वसामान्य व सच्चा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या मालोजी शिंदे यांना कुडाळ गटातून जिल्हा परिषदेत जाण्याची संधी मिळणे आवश्यक आहे.
जनतेप्रती त्यांची तळमळ आणि प्रेम मी जवळून पाहिले आहे. माझ्याबरोबरचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मालोजी शिंदे यांच्यासोबत असून माझा शिंदे यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आपल्या कुडाळ गटातील सर्व प्रकारचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी कुडाळ गटातील जनतेने मालोजी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे. आपल्या गटाचा आणि गटातील प्रत्येक गावाचा
सर्वांगीण विकास करण्यासाठी मालोजी शिंदे यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले आहे.
शिंदे यांना संधी देण्याचे आवाहन
विरोधात कोण आहे हे महत्वाचे नसून कुडाळ गटातील जनतेशी आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वासाची नाळ जोडली गेल्याने मालोजी शिंदे यांचा विजय निश्चित आहे. मालोजी शिंदे यांना कुडाळ गटातील जनतेची सेवा करण्याची संधी द्या, या संधीचे निश्चित सोने होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मालोजी शिंदे यांना बहुमतांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.