लंडन – भारतातील बॅंकांचे कर्ज बुडवून विदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याने आपल्यावर करण्यात आलेल्या हद्दपारीच्या कारवाईला गेल्या वर्षी मॅजिस्ट्रेट कोर्टात आव्हान दिले होते. कोर्टाने त्याची ही याचिका फेटाळून लावल्यानंतर मल्ल्या याने तेथील हायकोर्टात धाव घेतली होती. पण हायकोर्टातही त्याला दिलासा मिळू शकला नाही. मल्ल्याची ही आव्हान याचिका ब्रिटनच्या हायकोर्टानेही आज फेटाळून लावली आहे.
आता त्याच्या मागणीच्या संबंधात तोंडी सुनावणी होणार आहे. मल्ल्या याने भारतातीाल बॅंकांमध्ये मोठाच घोळ केल्याचे निरीक्षण तेथील न्यायालयानेही नोंदवले आहे. त्यामुळे मल्ल्या याच्या अडचणीत मोठीच वाढ झाली आहे. ब्रिटन मधून आपल्याला भारतात हद्दपार केले जाऊ नये यासाठी मल्ल्या हा लंडन मधील न्यायालयाचा आश्रय घेऊन तेथे दिवस काढीत असला तरी त्याला तेथील न्यायालयाकडून आता दिलासा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा ताबा लवकरच भारतीय अधिकाऱ्यांना मिळू शकतो.