बेळगाव – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे प्रमुख चेहरे असणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधी या बंधू-भगिनींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. प्रियंका महिला शक्तीचे, तर राहुल युवा शक्तीचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले.
खर्गे यांनी प्रियंका यांची तुलना झांसीच्या राणी लक्ष्मीबाईंशी केली. प्रियंका अतिशय कणखर वृत्तीच्या आहेत. माजी पंतप्रधान आणि वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कुटूंबाला सावरण्याचे कार्य त्यांनी केले, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. महात्मा गांधींबद्दल आदर असल्याचे मोदी आणि शहा वरवर दाखवतात. प्रत्यक्षात ते गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेला पुजतात.
कॉंग्रेसने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीतील पराभवाची निश्चिती करून अवमान केला, हा भाजपचा दावा खर्गे यांनी खोडून काढला. त्यासाठी त्यांनी सभेत आंबेडकर यांनी एका मित्राला लिहिलेले पत्र उघड केले.
माझ्या पराभवाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कॉम्रेड डांगे जबाबदार असल्याचे आंबेडकर यांनी पत्रात नमूद केले आहे. कॉंग्रेसनेच इतर निवडणूक जिंकण्यास आंबेडकर यांना मदत केली, असा प्रतिदावाही खर्गे यांनी केला.