Maharashtra Assembly Elections 2024 – भाजप हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा शत्रू असल्याचे टीकास्त्र कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी सोडले. तसेच, महापरिवर्तन ही महाराष्ट्राची मागणी असल्याचा दावाही त्यांनी केला.
राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या जात असलेल्या विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्र राज्य सामोरे जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, खर्गे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांशी निगडीत मुद्दे उपस्थित करून भाजपवर निशाणा साधला.
तब्बल २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कृषी क्षेत्राशी संबंधित निधीत मोठी कपात करण्यात आली. २० हजार कोटी रूपयांच्या पाणीग्रिडचे आश्वासन खोटे ठरले. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवण्याचे आश्वासन म्हणजेही जुमलाच आहे.
अन्नदात्याला भरपाई उपलब्ध करण्यास नकार देण्यात आला. त्याउलट, विमा कंपन्यांवर ८ हजार कोटी रूपयांचा वर्षाव करण्यात आला. निर्यात बंदी आणि उच्च निर्यात शुल्कामुळे कांदा, सोयाबीन उत्पादकांवर मोठा भार पडला. कापूस आणि ऊस उत्पादनात घट झाल्याने शेतकरी त्रस्त झाला.
सहकारी दूध संस्था संकटात असल्याचे सरकारनेच मान्य केले असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपच्या डबल इंजिन सरकारला सत्तेवरून हटवण्यात आल्यानंतरच शेतकऱ्यांचे भले होईल अशी खूणगाठ महाराष्ट्राने बांधली आहे, असा दावाही खर्गे यांनी केला.