Malkhan Singh । हौतात्म्य, मृतदेहाची वाट आणि या प्रतिक्षेत ५६ वर्षांचा प्रदीर्घ काळ… ही गोष्ट आहे उत्तरप्रदेशच्या सहारनपूरच्या शहीद मलखान सिंग यांची. ज्यांचा मृतदेह तब्बल ५६ वर्षांनी हिमाचल प्रदेशातील रोहतांग खिंडीतून सापडला. मलखान सिंग हे हवाई दलाचे जवान होते. 1968 मध्ये विमान अपघातात ते बेपत्ता झाले होते. हा विमान अपघात 7 फेब्रुवारी 1968 रोजी रोहतांग खिंडीजवळ झाला होता, ज्यामध्ये एकूण 102 सैनिक होते. 56 वर्षांनंतर त्याच्या बॅच नंबरच्या आधारे त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. ही बातमी समजल्यानंतर मलखान सिंग यांच्या कुटुंबात आणि संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आली. त्यासोबतच अभिमानाचे वातावरणही होते. मात्र या ५६ वर्षांत मलखान सिंगच्या कुटुंबात खूप काही बदलले.
मलखान सिंग हे सहारनपूरचे रहिवासी Malkhan Singh ।
मलखान सिंग हे सहारनपूरचे नानौता पोलीस स्टेशन क्षेत्रातील फतेहपूर गावचे रहिवासी होते. मलखान सिंग यांचा जन्म १८ जानेवारी १९४५ रोजी झाला. ते बेपत्ता झाले तेव्हा तो केवळ 23 वर्षांचे होते. अपघातानंतर त्याचा शोध लागला नव्हता. मलखान सिंगचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य त्याच्या परत येण्याची वर्षानुवर्षे वाट पाहत होते. मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही.
बायकोचे लग्न लहान भावाशी
विमान अपघाताच्या बातमीने मलखान सिंग यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. मलखान सिंग बेपत्ता झाल्यानंतर त्यांची पत्नी शिलावती हिचा पुनर्विवाह मलखान सिंगचा धाकटा भाऊ चंद्रपाल सिंग याच्याशी झाला. या अपघाताच्या वेळी शिलावती गरोदर होत्या आणि त्यांचा एक मुलगा रामप्रसाद हा अवघा दीड वर्षांचा होता. कुटुंबाने मलखान सिंग यांना कधीही मृत घोषित केले नाही, म्हणून पितृ पक्षातही त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी कोणतेही तर्पण विधी केले गेले नाहीत.
आई, वडील, पत्नी आणि मुलाचा मृत्यू Malkhan Singh ।
आता 56 वर्षांनंतर जेव्हा मलखान सिंग यांचा मृतदेह सियाचीनमध्ये सापडला तेव्हा कुटुंबाच्या वेदना आणि प्रतीक्षा या सगळ्या भावना एकत्र आल्या. मात्र, आता त्यांची पत्नी शिलावती आणि मुलगा रामप्रसाद यांचाही मृत्यू झाला आहे. आई-वडीलही आता या जगात नाहीत.
नातवाने अंत्यसंस्कार केले
मलखान सिंग यांच्यावर आता त्यांचा नातू गौतम याने अंत्यसंस्कार केले. कुटुंब आर्थिक संकटाशी झुंजत आहे. मलखान सिंग यांचे नातू मनीष आणि गौतम उदरनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करतात. मलखान सिंगचेलहान बंधू ईशम पाल सिंग म्हणाले की, “जर हा मृतदेह आधी सापडला असता तर कदाचित मलखान सिंग यांच्या पत्नी आणि मुलाला अंतिम संस्कार करण्याची संधी मिळाली असती.” असे भावुक उद्गार त्यांनी काढले.
हजारो लोक जमले
मलखान सिंग यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या जवानांनी त्यांच्या मूळ गावी फतेहपूर येथे आणले. अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक त्याठिकाणी गोळा झाले होते. ‘मलखान सिंग जिंदाबाद’च्या घोषणा सर्वत्र देण्यात आल्या . मलखान सिंग यांचा नातू गौतम याने त्यांच्या चितेवर अंत्यसंस्कार केले आणि त्यांचे अंतिम संस्कार पूर्ण लष्करी सन्मानाने करण्यात आले.
मलखान सिंग यांना शहीद दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी गावातील नागरिक व कुटुंबीयांनी केली असून, ही 56 वर्षांची प्रदीर्घ आणि वेदनादायी प्रतीक्षा आता संपली असल्याचेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.