कराड – मलकापूर शहरातील सर्व मार्गावर असणारी अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी ठराव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. अतिक्रमणे काढण्यापूर्वी संबंधितांना नोटिसा देऊन स्वतःहून अतिक्रमण काढण्याची संधी दिली जाणार आहे. दरम्यान, सभेत 24 कोटी 79 लाख 87 हजार रुपयांच्या विकास आराखड्याला सभागृहाने मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा नीलम येडगे होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी उपस्थित होत्या.
मलकापूर शहरात वाढत्या अतिक्रमणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर नाका ते एनपी मोटर्सपर्यंत, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला साडेचार मीटरपर्यंत असलेले अतिक्रमणे, ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योगपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन मीटरपर्यंत असलेले अतिक्रमणे याशिवाय मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगरपर्यंतची अतिक्रमण काढण्यात हटवण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. ही अतिक्रमणे काढत असताना संबंधितांना नोटिसा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याची संधीही देण्यात येणार आहे. विषयपत्रिकेवरील 19 विषयांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी 2020-21 च्या विकास आराखड्यास एकमताने मंजुरी देण्यात आली. यात नगरोत्थान जिल्हा स्तरमधून 10 कोटी 45 लाख, नागरी दलितेत्तर विकास योजनातून 2 कोटी 73 लाख 87 हजार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजनेतून 9 कोटी 31 लाख, जिल्हास्तरीय अग्निसुरक्षा योजनेतून 50 लाख, नगर विकास योजनेतून 1 कोटी 20 लाख असा सुमारे 24 कोटी 79 लाख 87 हजार रुपयांचा विकास आराखड्याला सभागृहाने मंजुरी दिली. मलकापूर पालिकेच्या कार्यक्षेत्रात दि.1 एप्रिलपासून बांधकाम परवाना ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे. ऑनलाईन परवान्याची कार्यवाही जोपर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या इतरही परवानांना नियमानुसार परवानगी दिली जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मलकापूर ग्रामपंचायतीपासून नगरपालिकेच्या वाटचालीत स्टॅम्पपेपर वर लिहून दिलेले व सार्वजनिक वापरासाठी अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याची पालिकेच्या दप्तरी नोंद करण्यास सभागृहाने मंजुरी दिली. मलकापूरमध्ये प्लॅस्टिक बंदी अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात प्लॅस्टिक वापरणारे व विक्री करणाऱ्यांवर 5 हजारापासून 25 हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या अभियानाच्या प्रबोधनासाठी फ्लेक्स बोर्ड, पथनाट्य आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच घनकचरा व्यवस्थापनामधून जमा होणाऱ्या प्लॅस्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदी करण्यास व श्रेड केलेले प्लॅस्टिक रस्ता डांबरीकरण कामांमध्ये वापरण्यास सभागृहात मंजुरी दिली.अपार्टमेंट उभा करत असताना त्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया युनिट बसविण्याबाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. त्यानुसार पंधरा ते वीस फ्लॅटच्या इमारती व त्यापुढील सर्व इमारतींना सांडपाणी प्रक्रिया युनिट बसविण्याबाबत सक्ती केली जाणार असून त्याबाबतचा निर्णय बांधकाम व्यवसायिक व संबंधित लोकांशी चर्चा करून घेतला जाणार आहे.