मलकापूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात 51 व्या स्थानी

मनोहर शिंदे : भाजप नगरसेवकांकडून चुकिची माहिती पसरविण्याचा उद्योग

कराड – मलकापूर नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या यादीमध्ये 200 नंबर मध्येही समावेश नाही. अशी चुकीची माहिती भाजपच्या नगरसवेकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यांनी प्रथम याबाबतची अधिक माहिती घ्यावी. कारण मलकापूर स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये 51 व्या स्थानी आहे. यावरुन त्यांचे याबाबतचे अज्ञान प्रकट होत आहे. विनाकारण नागरिकांच्यामध्ये गैरसमज पसरवू नये, असा निर्वाणीचा सल्ला उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

मलकापूर नगरपंचायत/नगरपरिषदेने मलकापूर हद्दीमध्ये सन 2018 व 2019 या दोन्ही वर्षामध्ये उल्लेखनिय काम केले असून मलकापूर शहरामध्ये 9 घंटागाड्यांद्वारे दररोज ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे वर्गीकरण करुन संकलन करुन प्रक्रिया केली जात आहे. दररोज संगम हॉटेल ते कोयना औद्योगिक वसाहत, ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग, मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगर या व्यवसायिक क्षेत्रामध्ये स्वच्छता केली जाते. गेल्या 2 वर्षामध्ये याचा अनुभव नागरिकांना आहे व ते याबाबत नेहमीच समाधान व्यक्त करत आहेत. मलकापूर नगरपंचायतीचे उच्च न्यायालयाच्या आदेशाने नगरपरिषदेमध्ये रुपांतर झाले व विद्यामान नगरपंचायतीचा 29 सप्टेंबर 2018 रोजी कार्यकाल संपला. त्यानंतर प्रशासकीय कार्यभार सुरु झाला. स्वच्छ सर्वेक्षणाच्या काळामध्ये मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरु होती.

जानेवारीमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण झाले. त्यावेळी निवडणूकीचे कामकाज अंतीम टप्प्यात होते. प्रशासक तथा जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा, मुख्याधिकारी व आरोग्य विभाग प्रमुख यांना प्रयत्न करुनही स्वच्छतेच्या कामकाजाकडे पुर्ण लक्ष देता आले नाही. प्रत्यक्ष तपासणीच्या दरम्यान नागरिकांचा लोकसहभाग व फिडबॅक यामध्ये आपणाला आवश्‍यक तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्या वर्गवारीमध्ये गुण कमी मिळाले. प्रशासकीय कार्यकाळामध्ये नगरपंचायतीचा जो स्वच्छता मंच स्थापन केला होता. त्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती, लोकसहभाग व श्रमदान करणेचा प्रयत्न आम्ही केला. परंतु याबाबत काही विघ्नसंतोषी मंडळींनी प्रशासक तथा जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व मुख्याधिकारी यांचेकडे तक्रारी केल्या. त्यामुळे सहभाग नोंदविता आला नाही. परंतु जे हे प्रश्न विचारतात त्यांनी या कामामध्ये स्वत:चा काय सहभाग दिला.

याबाबत स्वत:च्या मनाला विचारुन मगच इतरांना प्रश्न विचारावेत. स्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्‍ट असून याबाबत स्वच्छता हीच सेवा ही संकल्पना घेऊन देशातील सर्व नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांनी भाग घेऊन काम केले. स्वच्छ सर्वेक्षणाचा मुळ उद्देश शहरातील दैनंदिन कचरा संकलन व त्यावर प्रक्रिया ही संकल्पना आहे याची नोंद घ्यावी. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये आपण देशामध्ये 123 व्या स्थानी होतो. सन 2019 मध्ये आपण 51 व्या स्थानी आहोत व 2020 मध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आपण दिलेल्या पत्राचा सकारात्मक विचार करुन आपल्या सर्वांना बरोबर घेऊन व नागरिकांचा लोकसहभाग घेऊन पहिल्या दहा मध्ये येण्याचा मानस आहे.

नगराध्यक्षा यांचे अधिकाराबाबत यापूर्वीही प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपणा सर्वांना अवगत केले आहे. कृष्णा हॉस्पिटलच्या टॅक्‍सच्या मुद्यावर न्यायालयामध्ये टॅक्‍स सुरु असून हा मुद्दा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. या व्यतिरिक्त नागरिकांच्या इतर प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पहावे तसेच सर्वच गोष्टीत राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. सदरचा खुलासा हा नागरिकांच्या माहितीसाठी करत आहे तसेच सन 2019 च्या निवडणूकीमध्ये मलकापूरच्या सूज्ञ नागरिकांनी कॉंग्रेस पक्षाला जनादेश दिला आहे याची नोंद घ्यावी. असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)