अकोले (प्रतिनिधी) – वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नातून समोरासमोर उभे ठाकलेल्या बिबट्या नर व मादी यांच्यात काल पहाटे लहित शिवारात संघर्ष झाला.या वर्चस्व वादाच्या लढाईत जखमी होऊन दोघेही ही गतप्राण होण्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत वन्यप्रेमी कडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काल पहाटे दोन वाजेच्या सुमारास लहित शिवारामध्ये बिबट्यांचा डरकाळ्या फोडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे बघ्यांनी डोकावून पाहिले असता , तेथे आणखी एक बिबट्या उपस्थित असल्याचे पाहिल्यावर त्यांनी तेथून पळ काढला. आणि सकाळी तेथे आठ महिन्याची मादी बिबट्या आणि सव्वा वर्षाचा नर बिबट्या जखमी अवस्थेत मृत्यू झालेले आढळून आले.
गावचे पोलीस पाटील यांनी वनविभागाला ही माहिती तातडीने कळवली आणि त्यानंतर या विभागाच्या प्रमुख वनक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी वनरक्षक विजय जावळे,वनक्षेत्रपाल जे टी घोडासरे यांना सोबत घेतले आणि घटनास्थळाला भेट दिली. तेथे त्यांना दोन्ही बिबटे मृतावस्थेत आढळले. हा सर्व प्रकार त्यांनी उपविभागीय वनाधिकारी गणेश झोळे यांना कळवला.
त्यांच्या मार्गदर्शनानुसार कोतूळ, अकोले येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोन्ही बिबट्यांचा शवविच्छेदनाचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे शवविच्छेदन केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंगावरील जखमा आणि अन्य बाबतचे छायाचित्र काढून, आतील काही शरीराच्या अंतर्गत जखम असणारा भाग (दोन्हीही बिबट्यांचा) पुणे वैद्यकीय पशुवैद्यकीय शाळेसाठी पाठवून दिला. यातून काही घातपाताचा प्रकार आहे काय ?हे उघड होण्यास मदत होणार आहे.
त्यानंतर हे दोन्ही बिबटे सुगाव रोपवाटिका येथे आणण्यात आले आणि त्यांच्या वर वनखात्याच्या नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले.या जनावरांचा झालेला मृत्यू हा धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया वन्य प्राणी प्रेमी प्रा विठ्ठल शेवाळे,प्राचार्य शांताराम गजे, डॉक्टर सुनील शिंदे व शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी दिली.