विविधा: मालतीबाई बेडेकर

माधव विद्वांस

आपल्या लेखनातून स्त्रियांवर होणारे अत्याचार व त्याची कारणमीमांसा करणाऱ्या मालतीबाई बेडेकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म रायगडजवळील आवास या गावी 1 ऑक्‍टोबर 1905 रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव बाळूताई खरे होते. कुटुंब मध्यमवर्गीय पण पुरोगामी विचारांचे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झाले होते. त्यांना मोठी बहीण होती. त्यांचा जन्म त्यांचा आजोळी झाला. त्यावेळी सासरेबुवांनी जावयाला म्हणजेच खरे मास्तरांना कळविले की, माझ्या मुलीला दुसरी मुलगी झाली याचे वाईट वाटते. खरे मास्तरांनी लगेच त्यांना उत्तर दिले की, मला मुलगी झाल्याबद्दल आनंद आहे.

मी माझ्या मुलींना उच्च शिक्षण देणार आहे. त्यांनी त्यांच्या थोरल्या मुलीलाही पदवीपर्यंत शिकविले होते. ही मुलगी म्हणजे मालतीबाईंची थोरली बहीण प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ कृष्णाबाई मोटे. मालतीबाई बी.ए., बी.टी., एम.ए. झाल्या. त्यांचे शिक्षण घोडनदी (शिरूर), हिंगणे आणि मुंबई येथे झाले. “प्रदेयागमा’ (पी.ए.) ही कर्वे विद्यापीठाची, एम.ए.च्या दर्जाची पदवी त्यांनी मिळविली. मालतीबाईंवर सुरुवातीपासूनच प्रागतिक विचारांचे वडील, महर्षी अण्णासाहेब कर्वे, वामन मल्हार जोशी, श्री. म. माटे ह्यांच्या व्यक्‍तिमत्त्वांचा प्रभाव पडलेला होता.

वर्ष 1938 मधे विश्राम बेडेकर ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तेही पुरोगामी विचारांचे होते व त्यांनी मालतीबाईंना प्रोत्साहन दिले. वर्ष 1925 पासून त्या लेखनाकडे वळल्या. “अलंकार मंजुषा’ हा ग्रंथ वर्ष 1931 मध्ये लिहिला. त्यानंतर काशीनाथ नरसिंह केळकर ह्यांच्याबरोबर “हिंदू व्यवहार धर्मशास्त्र’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. अलंकार मंजुषा हा अलंकार शास्त्रावरील ग्रंथ असून हिंदू व्यवहार धर्मशास्त्रात हिंदू कायद्याचे सोपे, सुबोध विवेचन केले. त्यांचा कळ्यांचे निःश्‍वास हा कथासंग्रह वर्ष 1933 मध्ये प्रकाशित झाला. यामधे मुख्यत्वेकरून पुरुषी अहंकारातून स्त्रियांना होणाऱ्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली.

पुरुषी अहंकारामुळे स्त्रियांवर होणारे आघात, वाढत्या कौमार्यकाळामुळे त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा ह्यांचे दर्शन त्यांनी आपल्या लेखनातून समाजापुढे प्रभावीपणे मांडले. हा त्यांचा पहिला कथासंग्रह विभावरी शिरूरकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध झाला. यावेळी मराठी साहित्यविश्‍वात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे विभावरी शिरूरकर कोण याची सर्व वाचक व लेखकांना उत्सुकता होती. या विभावरी कोण याचा लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ही व्यक्‍ती कोण याचा ठावठिकाणा कोणालाही लागला नाही. पुढे काही वर्षांचा काळ लोटल्यावर कळ्यांचे निःश्‍वास या कथासंग्रहातील एक कथा “साखरपुडा’ या मराठी चित्रपटासाठी घेण्यात आली. तेव्हा विभावरी शिरूरकर म्हणजे मालतीबाई बेडेकर होत, हा गौप्यस्फोट झाला.

समाजाचा स्त्रियांबद्दल, शिक्षणाच्या बाबतीत असलेला दृष्टिकोन पाहून त्या व्यथित होत असत. वर्ष 1934 मध्ये “हिंदोळ्यावर’ ही कादंबरी लिहिली. समाजाच्या मानसिकता व परंपरेविरुद्ध यातून त्यांनी वाचा फोडली. त्याआधीही श्रद्धा, बी. के., कटुसत्यवादिनी, एक भगिनी, बाळुताई खरे या नावाने लेखन करीत असत. पुढे अनेक वर्षांनी मालतीबाईंना विचारण्यात आले की, टोपणनावाने का लिहिता?’ त्या म्हणाल्या, मी माझे नाव लावले असते तर मला लोकांनी गाडून टाकले असते. माझी नोकरीही गेली असती.’ विभावरींची ही पुस्तके, हे लेखन अश्‍लील आहे म्हणून त्यावर बहिष्कार घाला, त्याची होळी करा’ असा प्रचार सुरू झाला. त्यांची अंत्ययात्राही प्रतिकात्मक काढण्यात आली. मात्र, मालतीबाईंनी कर्मठ समाजाला गदागदा हलवून जागे केले. यावेळी तात्यासाहेब केळकर, व्यंकटेश केतकर, आचार्य अत्रे हे त्यांच्या बाजूने ठाम उभे होते. त्यांनी होमिओपॅथी शास्त्राचा अभ्यास केला होता. वयाची 96 वर्षे त्या तत्त्वनिष्ठेने जगल्या. 7 मे 2001 मध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. या लेखिलेला अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.