सर्दी, ताप, चिकुनगुनियाचे रुग्ण उद्योगनगरीत वाढले
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनापाठोपाठ इतर आजारांनीही डोके वर काढले आहे. दिवाळीनंतर करोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढत असतानाच शहरामध्ये मलेरिया, डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश आजाराने डोके वर काढले आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरामध्ये सर्दी, खोकला, तापांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये शहरामध्ये सहा हजाराहून अधिक नागरिकांना मलेरिया सदृश तापाची लागण झाली. त्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये डेंग्यू, चिकुनगुनियासदृश आजारांमध्येही वाढ झाली आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यांमध्ये व्हायरल इन्फेक्शनच्या आजारामध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी सारखी लक्षणे नागरिकांमध्ये आढळत आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये 24 डेंग्यू तर 7 चिकुनगुणियाच्या संशयित रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यामध्ये वाढ झाली आहे.
ऑक्टोबर महिन्यामध्ये डेग्यूचे लक्षणे असलेले 61 तर चिकुनगुणियाचे लक्षणे असलेले 48 रुग्ण आढळले होते. नोव्हेंबर महिन्यामध्ये अनुक्रमे 76 व 113 अशी रुग्णांची नोंद झाली. तसेच मलेरियासदृश तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात 1325 मलेरियासदृश तापाच्या रुग्णांची नोंद झाली. तर ऑक्टोबरमध्ये 1496 व नोव्हेंबर महिन्यात 1243 रुग्णांची नोंद
झाली. या दोन महिन्यामध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळले.
शहरामध्ये करोना संसर्गाची भीती असताना या आजारांमध्येही वाढ होत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाने विषाणू संसर्गाचा अनेकांना त्रास होत आहे. एरवी अत्यंत सामान्य आजार म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र यावर्षी करोनाची धास्ती असल्याने घशात होणारी खवखव किंवा सर्दीही करोनाचीच आहे की काय याची नाहक भीती अनेकांना वाटत आहे. सांधेदुखी, कफ या आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. नागरिकांनी सर्दी, ताप व घसा खवखवणे अशी लक्षणे असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
वर्षभरात 27 हजार तीव्र तापाच्या रुग्णांची नोंद
जानेवारी महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत शहरात 27 हजार 212 तीव्र तापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. मे व जून महिन्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र जुलै महिन्यांपासून त्यामध्ये पुन्हा वाढ झाली. तर वर्षभरामध्ये 579 डेंग्यूचे व 173 चिकनगुनियाचे संशयित रुग्ण आढळले आहेत.
वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप व सांधेदुखी अशी लक्षणे नागरिकांमध्ये आढळत आहेत. डेंग्यू या आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी साफसफाईच्या नियमांचे पालन करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घराच्या आजूबाजूला पाण्याची डबकी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच लक्षणे आढळल्यास नजीकच्या मनपा दवाखान्यातून तपासणी करून घ्यावी.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, पिं.चिं.मनपा