मलाला युसुफझाईने पाकिस्तानच्या मुलांची काळजी करावी

भाजपकडून मलाला युसुफझाई यांना सल्ला

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरमध्ये पाच ऑगस्टपासून जनजीवन विस्कळीत आहे. जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर हिंसाचार होऊ नये यासाठी निर्बंध जारी करण्यात आले आहेत. अनेक दुकाने व शाळा तसेच सार्वजनिक वाहतूक अजूनही बंद आहे. त्यातच आता काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून तेथील मुलांना आताच्या तणावग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढून शाळेत जाण्यासाठी मदत करावी, असे आवाहन नोबेल विजेत्या पाकिस्तानी शिक्षण हक्क कार्यकर्त्यां मलाला युसुफझाई यांनी केले आहे. त्यावर भारतातून संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

मलाला यांना प्रत्युत्तर देताना भाजपच्या कर्नाटकमधील खासदार शोभा करंदलाजे म्हणाल्या की, मलाला यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांसाठीही वेळ काढून काम करावे. त्यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया नोंदविली आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्य समाजातील मुलींवरील जबरदस्तीच्या घटनांचे स्मरण मलाला यांना करून दिले आहे. या मुलींवर होणारे अत्याचार आणि त्यानंतर धर्मातरासाठी होणारी सक्ती याबाबत मलाला यांनी तेथील अल्पसंख्य समुदायांशी बोलावे, असे आवाहन खासदार करंदलाजे यांनी केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील नेत्यांनी काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत. काश्‍मीरमधील लोकांचे म्हणणे ऐकावे. तसेच मुलांना सुरक्षित शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी, असे युसुफझाई यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here