मलालाने पाकिस्तानी अल्पसंख्याकांबरोबर वेळ व्यतीत करावा

भाजपा खासदाराने दिला सल्ला
नवी दिल्ली: शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती आणि शिक्षण अधिकारासाठी काम करणारी पाकिस्तानची मलाला युसुफझाई हिच्यावर भाजप खासदार शोभा करांदलजे यांनी निशाणा साधला आहे. मलालाने काश्‍मीर संदर्भात एक ट्‌विट केले होते. यावरुन करांदलजे यांनी मलालावर टीकेची झोड उठवली आहे.

सर्वांत कमी वयात नोबेल पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मलालाने शनिवारी ट्‌विट केले होते. मी यूएनजीएतील नेत्यांना आवाहन करते की, काश्‍मीरमध्ये शांततेसाठी काम करा, काश्‍मिरींचा आवाज ऐका आणि मुलांना सुरक्षित शाळेत जाण्यास मदत करा, असे ट्‌विटमध्ये म्हटले. त्यावर करांदलजे यांनी ट्‌विट करत मलालाला पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायातील मुलींवर होत असलेल्या अत्याचाराची आठवण करुन दिली.

स्वात खोऱ्यात वर्ष 2012 मध्ये तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्‌यानंतर 22 वर्षीय मलाला इंग्लंडमध्ये राहत आहे. तिने ट्विट करत काश्‍मीरमधील विद्यार्थ्यांप्रती चिंता व्यक्त केली. गेल्या 40 हून अधिक दिवसांपासून ही मुले शाळेत गेलेली नाहीत. भीतीपोटी आपल्या घराबाहेर पडत नसल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले होते.

काश्‍मीरमध्ये राहणाऱ्या मुलींशी मी थेट चर्चा करु इच्छिते. काश्‍मीरमध्ये संवाद माध्यमांवर निर्बंध असल्याने तेथील गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागले. काश्‍मिरी लोक जगापासून तोडले गेलेले आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडता येईना. काश्‍मीरला बोलू द्या, असे तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. तिच्या या ट्विटला उत्तर देत शोभा करांदलजे यांनी समाचार घेतला.

त्यातच काही दिवसांपुर्वी मलालाला पाकिस्तानातील हिंदू मुलींवर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात आवाज उठवावा असा सल्ला ट्विटरवरुन देणाऱ्या तरुणांना मलालाने ब्लॉक केले होते. यानंतर तिच्यावर बरिच टिका झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.