नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वपक्षीयांना दिलेल्या कानपिचक्यांचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. आश्वासने देणे सोपे असले तरी त्यांची अंमलबजावणी अवघड असल्याची जाणीव कॉंग्रेसला होऊ लागली आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. एका पाठोपाठच्या प्रचारावेळी कॉंग्रेसकडून जनतेला अनेक आश्वासने दिली जातात. त्यांची अंमलबजावणी कधीच करता येणार नाही याची जाणीव त्या पक्षाला असते.
आता त्या पक्षाचे सत्य जनतेसमोर उघड झाले आहे, असे भाष्य मोदींनी सोशल मीडियावरून केले. कॉंग्रेसच्या कर्नाटक शाखेची पत्रकार परिषद गुरूवारी झाली. त्यावेळी खर्गे यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार उपस्थित होते. त्यावेळी खर्गे यांनी मिश्कील आणि हलक्याफुलक्या शैलीत शिवकुमार यांना त्यांनी आधी केलेल्या वक्तव्यावरून कानपिचक्या दिल्या. महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा देणाऱ्या शक्ती योजनेचा फेरआढावा घेण्याचे सूतोवाच शिवकुमार यांनी केले होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी कॉंग्रेसने तेथील जनतेला ५ गॅरंटी दिल्या. त्यामध्ये शक्ती योजनेचा समावेश होता. त्यामुळे खर्गे यांना बहुधा शिवकुमार यांचे वक्तव्य रूचले नाही. कॉंग्रेसच्या कर्नाटकमधील गॅरंटींचा उल्लेख मी महाराष्ट्रातही केला. तुमच्या वक्तव्याने भाजपला आयतीच संधी मिळाली, असे खर्गे यांनी शिवकुमार यांना उद्देशून म्हटले.
खर्गेंनी दिलेल्या कानपिचक्यांचा संदर्भ घेऊन स्वत: मोदींनी कॉंग्रेसला घेरले. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या कॉंग्रेसशासित राज्यांमधील विकासाचा मार्ग आणि आर्थिक आरोग्य वाईटातून आणखी वाईटाकडे वाटचाल करत आहे. खोट्या आश्वासनांच्या कॉंग्रेस पुरस्कृत संस्कृतीबाबत जनतेने दक्षता बाळगायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.