बारामती ट्रेकर्स क्लबच्या स्थापनेची पार्श्वभूमी ही या क्लबचेच सदस्य असलेल्या जिवलग मित्रांच्या आतापर्यंतच्या प्रवासात दडलेली आहे. या सर्वांना कॉलेज जीवनापासूनच ट्रेकिंगची आवड निर्माण झालेली. बाईकवर तसेच मिळेल त्या गाडीने अगदी कुठेही प्रवास केला जात असे. ट्रेकिंग खऱ्या अर्थाने सुरू होईपर्यंत महाराष्ट्रातील बरीच ठिकाणं ते माळशेज घाटापासून ते लेण्याद्री, पाली, अजिंठा, वेरूळ, कोल्हापूर, भारत इतिहास संशोधक मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, मुंबई आदी ठिकाणांना भेटी दिल्या. प्रत्येक जण आपापल्या पायावर उभे राहिले तेव्हाही ट्रेकिंगची, वेगवेगळ्या ठिकाणी जायची आवड कायम होती.
याकाळात या सर्वांनी केरळ, जम्मू-काश्मीर, उटी, उज्जैन, खजुराहो, कन्याकुमारी, मद्रास, पद्मनाभ मंदिर, केरळ या आणि भारतातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. मोटासायकलीवरून बारामती ते लेह-लदाख हा प्रवास केला. तसेच, बारामती-कन्याकुमारी-बारामती असाही मोटारसायकीलवर 3500 किमीचा प्रवास फक्त 13 दिवसांत पूर्ण केला. यातून सर्वांचीच ट्रेकिंगची आवड वाढत गेली. सर्वांना महाराष्ट्राचा इतिहास आणि सह्याद्री याबद्दल जबरदस्त आकर्षण होते. याच काळात ऍड. सचिन वाघ, योगेश वाघ, राहुल झाडे यांनी इतिहासाच्या आवडीमुळे या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. खरं तर सचिन वाघ हे वकील, राहुल झाडे हे इंजिनिअर तर योगेश वाघ हे बॅंकिंग क्षेत्रात काम करणारे; तरीही इतिहासात आवड असल्यामुळे पुणे विद्यापीठातून या सर्वांनी इतिहास विषयात एम.ए. पदवी घेतली. त्यादरम्यानच बारामती ट्रेकर्स क्लबच्या स्थापनेची संकल्पना सर्वांनी व्यक्त केली.
बारामती ट्रेकर्स क्लबच्या स्थापनेच्या अगोदर या सर्वांनी महाराष्ट्रातील बरेच किल्ले, ऐतिहासिक मार्ग पाहिले होते. तसेच, राजगड, रायगड, पन्हाळगड ते पावनखिंडचा (60 किमी) ट्रेक, राजमाची, लोहगड, कमळगड, पांडवगड असे अनेक किल्ल्यांचे ट्रेक हा क्लब स्थापन करण्याअगोदर केले होते. इतिहास अभ्यासक योगेश वाघ, राहुल झाडे यांनी इतिहासातील अनेक घटनांवर क्लबच्या माध्यमातून अनेक ट्रेकर्सला इतिहासाची माहिती दिली आहे. योगेश वाघ यांनी इतिहासावर अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत. क्लबचे आधारस्तंभ बारामती ट्रेकर्स क्लबचे संस्थापक सदस्य योगेश वाघ आणि प्रशांत राजपुरे यांनी मागील महिन्यात महाराष्ट्रातील उंच आणि खूप अवघड, असा लिंगाणा किल्ला सर केला. ऍड. सचिन वाघ (अध्यक्ष), योगेश वाघ, राहुल झाडे, प्रशांत राजपुरे, प्रदीप ताटे, संदीप बांदल, हरीश कुंभरकर, पदम निकम, प्रशांत पवार हे सर्वजण बारामती ट्रेकर्स क्लबचे सदस्य या क्लबचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात मोलाचं योगदान देत आहेत.
बारामती ट्रेकर्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष ऍड. सचिन वाघ यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या ट्रेकिंगच्या अनेक वर्षाच्या अनुभवामुळे बारामती ट्रेकर्स क्लब यशस्वीपणे पुढे जात आहे. या क्लबने आत्तापर्यंत राजगड, तिकोना, रोहिडा, लिंगाणा ते रायगड असे अनेक ट्रेक पूर्ण केले आहेत.
सर्वसामान्य लोकांना, नव्या पिढीला, आपल्या किल्ल्यांचा तसेच आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचे महत्त्व समजावे आणि त्या इतिहासातून एक नवीन पर्यावरणाशी संवेदनशील पिढी निर्माण व्हावी, हा बारामती ट्रेकर्स क्लबच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. या क्लबची स्थापना आम्ही कुठलाही व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवून केलेली नाही. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास हा ट्रेकिंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवायचा तसेच आपला ज्वलंत इतिहास, इतिहासातील अनेक नायक, त्यांचे बलिदान, इतिहासातील दुर्लक्षित घटना, वास्तू, ऐतिहासिक वेगवेगळे मार्ग, किल्ले हे नव्या पिढीसमोर जावे या उद्देशाने आम्ही काम करीत आहोत. अभेद्य गड किल्ल्यांवर, वास्तूंमध्ये असणारा इतिहासाचा सुगंध प्रत्येकाच्या आयुष्यात दरवळावा आणि प्रत्येकाच्या जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी क्लब प्रयत्नशील राहणार आहे.
– ऍड. सचिन वाघ,
अध्यक्ष, बारामती ट्रेकर्स क्लब, बारामती
ट्रेकिंग हा साहसी लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय. इतिहासाची आवड म्हणून यासाठी वेळ देत असताना बारामती ट्रेकर्स क्लबची स्थापना औपचारिकपणे झाली. आपला व्यवसाय सांभाळत सुट्टीच्या कालावधीत ट्रेकिंगचा आनंद सर्व मंडळी घेत असतात. काही गोष्टी ठरवून होत नाहीत. परंतु, तुमचा आनंद आणि छंद असेल तर त्या आपोआप होतात. बारामती ट्रेकर्स क्लबची स्थापना ही त्यातीलच एक भाग आहे.
– योगेश वाघ, सदस्य
(संकलन : निलेश चांदगुडे, शेटफळगढे)