शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्या: पिचड

अकोले  -तालुक्‍यातील शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. पिचड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री नितीन राऊत, कृषीमंत्री दादा भुसे आदींना निवेदन पाठवून तालुक्‍यातील विविध प्रकारच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. कोल्हार घोटी राज्यमार्ग क्र.44 या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण केले जावे वीजबिल माफ करावे अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात 144 कलम लागू असून जनता घरात बसून आहे.जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.

वीजबिल भरणेही त्यांना कठीण झालेले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने सर्वांचेच वीज बिल माफ करून जनतेला दिलासा द्यावा व वीजबिल माफीचा आदेश काढावा अशी मागणी केली आहे.
अकोले तालुक्‍यातून जाणाऱ्या राजमार्ग क्र.44 च्या रस्त्याचे काम करतांना वळण रस्ते काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता आहे. तसेच राजूर संगमनेर या 44 किमी या रस्त्याचे काम अद्याप चालू झालेले नाही.

पावसाचे दिवस लक्षात घेता रस्त्याचे काम जलदगतीने करण्याच्या दृष्टीने ठेकेदारांना आदेश देण्यात यावे व रस्त्याचे काम मार्गी लावावे अशीही मागणी त्यांनी केली आहे. कृषीमंत्री भुसे यांना दिलेल्या पत्रात पिचड म्हणाले की, अकोले हा आदिवासी व दुर्गम भाग असून येथे पावसाचे प्रमाण जास्त असते. या भागातील जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. अकोले तालुक्‍यात शेतीसाठी युरिया खताची गरज जास्त असून मागणीप्रमाणे तालुक्‍यात युरिया खत उपलब्ध होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून अकोले तालुक्‍यात खत उपलब्ध करून द्यावे, असे पिचड म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.