घर बनवा पर्यावरणपूरक

आता घराला इको फ्रेंडली लूक देणे म्हणजे खर्चिक बाब असाच विचार पहिल्यांदा मनात आला असेल ना ! पण हे प्रकरण खर्चिक नाही. कमी खर्चात छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून घर पर्यावरणपूरक बनवू शकतो.

घर पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सर्वात पहिली गरज आहे ती इको फ्रेंडली उत्पादने म्हणजेच हर्बल प्रॉडक्‍टसचा वापर करावा. घरात रोज लागणारे सामान जसे उदबत्ती, मेणबत्ती, शॅम्पू, साबण, इत्यादी गोष्टींचाही त्यात समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी हर्बल असाव्यात. आत्ता घरात असणाऱ्या सर्व वस्तू फेकून देऊ नका ! पण जेव्हा त्या संपतील तेव्हा हर्बल उत्पादनांची खरेदी करा. आपले आरोग्य आणि घर या दोन्हींसाठी हे फायदेशीर आहे.

घरात लागणारे पडदे, चादरी, उशीची कव्हरे, पायपुसणी या गोष्टी सुती, खादी आणि मलमल सारख्या नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेल्या असाव्यात. रंगाचा विचार करता उन्हाळ्यात नैसर्गिक शीत रंगांची निवड करावी. जसे हिरवा, निळा, पांढऱा, मातकट रंगाच्या अनेक रंगछटा वापरू शकतो. म्हणजेच नैसर्गिक रंगाना आपल्या घरात स्थान द्या.

हल्ली प्लॅस्टिकचा जमाना असल्याने चटया देखील प्लॅस्टिकच्या असतात पण जाणीवपूर्वक त्या वापरणे टाळा. जमिनीवर घालण्यासाठी बांबूच्या चटया वापराव्यात किंवा सुती धाग्याची सतरंजी वापरावी. खिडकीला बांबूचे पडदे वापरावेत. ते दिसायलाही सुंदर दिसतात आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पूरक असतात.

घर सजवण्यासाठी प्लॅस्टिक फुलांचा वापर करू नये. रोज ताज्या फुलांचा वापर घर सजवण्यासाठी करावा. ताज्या फुलांचा वासही सुंदर येतो तसेच वातावरण शुद्ध राहाते. त्यामुळेच खोलीत रूम फ्रेशनरचा वापरही करावा लागत नाही.

घरामध्ये नैसर्गिक प्रकाश जास्त असावा असा प्रयत्न करावा. नैसर्गिक प्रकाश अडवणाऱ्या वस्तू बाल्कनी किंवा खिडकी ठेवू नये. घऱाची स्वच्छता राखावी सामानावर धूळ साठू देऊ ऩये. कारण धुळीमुळे ऍलर्जीचे विकार होतात. घरात सतत वीज जाळू नका म्हणजे सतत लाईट लावून ठेवू नका. त्यामुळे घरात उष्णता निर्माण होते. गरजेपुरता पण खूप प्रकाश नको असेल तेव्हा खोलीत मेणबत्ती लावून ठेवावी. एका कोपऱ्यात शांतपणे जळणारी मेणबत्ती सुंदर दिसते.

घर थंड रहावे यासाठी जमीन थंड असली पाहिजे. त्यासाठी सकाळी संध्याकाळी गार पाण्याने फरशी पुसून घ्यावी. त्यामुळे घरातील उष्णता थोडी कमी होईल आणि घर थंड राहिल.

घराच्या एका कोपऱ्यात अथवा मध्यभागी माती किंवा काचेच्या भांड्यात रोज स्वच्छ पाणी भरून गुलाबाच्या ताज्या पाकळ्या त्यात घालून ठेवाव्यात. दिसायला सुंदर दिसतेच पण वातावरणात एक सुवास भरून राहातो. गुलाबाच्या पाकळ्या नसतील तर झेंडू, मोगरा, चमेली सारख्या फुलांचाही वापर करू शकतो.

पर्यावरणाचा विचार करता एसीपेक्षा कुलरचा पर्याय उन्हाळ्याची तलखी कमी करण्यासाठी योग्य आहे. कुलरच्या पाण्यात सुगंध पसरवणारी द्रव्ये घातल्यास खोलीत मंद सुगंध पसरून वातावरण प्रफुल्लित होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.