हडपसर/कात्रज – मोदी-शहांना खुश ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक प्रकल्प गुजरातला नेले गेले. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे. राज्याच्या तिजोरीतील पैशांची हवी, तशी उधळपट्टी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी विकासाबाबत अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. ही स्थिती थांबवायची असेल, तर महाराष्ट्राची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. येथील स्वर्गीय अजितदादा बाबर भाजी मंडई मैदानातील सभेवेळी प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, भगवानराव वैराट, शिवसेनेचे वसंत मोरे, योगेश ससाणे, कल्पना थोरवे, संभाजी थोरवे, निलेश मगर, प्रवीण तुपे, समीर तुपे, सचिन खरात, विजयराव देशमुख, शैलेंद्र बेल्हेकर, डॉ. सुनील जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातून सर्वाधिक कररुपी पैसे केंद्र सरकारला जातो. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला काय मिळते, याचा विचार केला पाहिजे. राज्यातील सध्याचे सरकार स्वतःची पोळी भाजून घेण्यात दंग आहे. अशा स्वार्थी, भ्रष्ट सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे.