नितीन गडकरी यांनी अजित पवारांकडून मागविला प्रस्ताव
येरवडा ते शिक्रापूर वाहतूक कोंडी सुटण्याची आशा
पुणे – नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी येरवडा ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. याबाबत पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी निधीबाबत चर्चा केली असून गडकरी यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. त्यामधील महापालिकेच्या हद्दीतील येरवडा ते खराडी पुणे महापालिकेच्या हद्दीत येतो. नगर रस्ता हा राज्य मार्ग असल्याने राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या सिग्नल फ्री जुन्या पुणे-मुंबई रस्त्याच्या धर्तीवर हा रस्ता विकसित करण्यात यावा आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. त्यावर पवार यांनी शुक्रवारी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीला आमदार टिंगरे यांच्यासह महापालिका आयुक्त विक्रम कुमार, बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा झाली. त्यात पवार यांनी येरवडा ते शिक्रापूर हा रस्ता सहापदरी करण्याबरोबर कोणत्या ठिकाणी उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर करायचे यासंबंधीचा आराखडा करावा, अशी सूचना केली.
त्यासाठी जवळपास 3 हजार कोटींचा खर्च येईल, असा अंदाज बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. त्यावर पवार यांनी या रस्त्यासाठी केंद्राकडूनही निधीची मदत घेता येईल, असे स्पष्ट केले. त्यावर त्यांनी तत्काळ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. तसेच पुणे-नगर रस्त्यांवरील येरवडा ते शिक्रापूरपर्यंत सहा पदरी रस्त्यासाठी केंद्रानेही निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती केली. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यासंबधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवा, असे सांगितले असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.