पुणे – महापालिका हद्दीत पंधरा वार्ड ऑफिस असून त्या वॉर्ड ऑफिसला प्रत्येकी दोन अशा ३० टीम तयार करा. तसेच खड्डे बुजविणे आणि वाहतूक नियोजन करावे, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेला दिले. तसेच पोलिसांशी समन्वय ठेवण्याचा सल्लाही मोहोळ यांनी दिला.
येत्या काही दिवसांत शहरात एकही रस्त्यात खड्डा राहाता कामा नये, असा दमही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनला भरला आहे. त्यावर पुढील ४-५ दिवसांस खड्डे बुजविण्याची कार्यवाही करू, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मोहोळ यांनी मनपा आयुक्त राजेंद्र भोसले आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एकत्रित बैठक घेतली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
ठेकेदारांनी रस्त्यांची जबाबदारी घ्यायला हवी. पण जो कोणी घेत नसेल, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. कामात हयगय करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका. आम्हाला पुण्यातील रस्ते आणि वाहतूक सुरुळीत झालेली पाहिजे, असेही निर्देश दिले. प्रशासन शहराच्या या महत्वाच्या प्रश्नांबाबत लक्ष देत नसल्याने यावेळी त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. शहरात एकूण १ हजार ४०० किलोमीटरचे रस्ते असून, खड्डे बुजवण्यात महापालिका कमी पडत आहे. प्रशासनाने यावर काम केलं पाहिजे. वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
पोलिसांवरही नाराजी
वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सर्व वॉर्डन रस्त्यावर उतरावेत. होमगार्डचे मनुष्यबळही वापरून वाहतूक सुरुळीत करावी. ही उपलब्धता पुणे पोलिसांनी करुन द्यावी, अशीही सूचना मोहोळ यांनी केल्या. वाहतूक कोंडी झालेली असताना पोलीस रस्त्यावर दिवसत नसल्याची तक्रारही या बैठकीत करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्तांनी तत्काळ सर्व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उतरून कोंडी फोडण्यासाठी नियोजन करण्याचे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले.