चुका करू नका, राष्ट्रवादीचे पॅनल निवडून आणा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सल्ला ः माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

बारामती- गत निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका पुन्हा करू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या सभासद व कार्यकर्त्यांना दिला. यंदाच्या निवडणुकीत अनुभवी व्यक्तींबरोबर तरुणांनाही संधी देणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांची अस्मिता असलेला माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने सभासद व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विनायक पाटील, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, किरण गुजर, इम्तियाज शिकलकर, सदाशिव सातव, योगेश जगताप, नवनाथ बल्लाळ, केशव जगताप, करण खलाटे, नीता बारवकर, किशोर मासाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

माळेगाव कारखान्याच्या पंचक्रोशीत राष्ट्रवादीची ताकद आहे. असले तरी मागील निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. याचे आत्मचिंतन आम्ही केले असून राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराजीचे प्रमाण वाढले. गतवेळच्या निवडणुकीमध्ये 21 जागांसाठी 325 इच्छुक होते. याचाच फायदा विरोधकांनी उचलला. काही ठिकाणी सिंगल ओटिंग झाल्याने उमेदवार पराभूत झाले. यंदाच्या निवडणुकीत मात्र अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या, अशी सूचना अजित पवार यांनी केली. माळेगावच्या सत्ताधाऱ्यांवर देखील पवार यांनी टीका केली. नोकर भरतीवर बंदी असताना देखील नोकर भरती केली जात आहे. या पाठीमागे मतांचे राजकारण दडले आहे, असा आरोप पवार यांनी केला. ज्यादा भाव दिल्याचे सांगितले जाते.

सद्यःपरिस्थितीत मात्र सभासदांना प्रतिटन 284 रुपयांची देणे अध्याप बाकी आहे. राजकीय आकस मनात ठेवून काही संचालकांना अपात्र ठरवण्याचे काम देखील सत्ताधारी मंडळींनी केले असल्याचे पवार यांनी सांगितले. मदनराव देवकाते, अनिल तावरे आदींनी मनोगते व्यक्त केली.

  • सत्ताधाऱ्यांकडून सभासदांची दिशाभूल
    माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराची पोलखोल योगेश जगताप यांनी केली. इतर कारखान्यांशी तुलना करता “हम करे सो कायदा’ या तत्त्वाने गुरू-शिष्याचे जोडीने कारखान्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. तसेच सभासदांची दिशाभूल केली असल्याचा आरोप योगेश जगताप यांनी केला.
  • विजय संपादन करून पवारसाहेबांचा सन्मान करा
    माळेगाव सहकारी साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात गेल्याची खंत अद्याप आहे. शरद पवार साहेबांच्या नावाने माळेगाव साखर कारखान्याची ओळख राज्याला आणि देशाला आहे. मात्र, कारखाना विरोधकांच्या ताब्यात गेल्याने राज्यात आणि देशात बदनामी झाली. विरोधकांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पवार साहेबांनी कारखान्यात पाऊलही ठेवले नाही. यंदाच्या निवडणुकीत विजय संपादन करून साहेबांचा सन्मान वाढविण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here