मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर महाविकास आघाडीतील वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. यामुळे वनमंत्रीपद रिक्त असून या पदासाठी राज्यात शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात लॉबिंग करण्यात येत आहे. अनेक आमदार वनमंत्रीपदासाठी फिल्डींग लावत असताना या स्पर्धेत आता नगरसेवकाने देखील उडी घेतली आहे.
संजय राठोड यांच्या मतदार संघातील दारव्हा नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेवकाने या पदावर दावा केला आहे. या नगरसेवकांना थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून माझा दांडगा अभ्यास आहे, मलाच वनमंत्री पदावर विराजमान करा, अशी मागणी केली आहे. या नगरसेवकाचे नाव रवी तरटे असे असून ते दारव्हा येथील प्रभाग ४ मधील नगरसेवक असल्याचे समजते. तरटे यांच्या पत्राने राजकीय वर्तुळात वनमंत्री पदावरून चांगलीच चर्चा रंगली आहे.
मंत्रीमंडळात माझी नियुक्ती केल्यास विदर्भाला मंत्रीमंडळात स्थान मिळेल. संजय राठोड यांच्याच विधानसभा मतदारसंघातील असल्याने मला राठोड यांचेही मार्गदर्शन लाभेल. माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन मला विधान परिषदेवर घेऊन वन खात्याचं मंत्रीपद द्यावं, असं रवी तरटे यांनी पत्रात म्हटलं आहे. मागील पाच वर्षांपासून मी शिवसेनेत निष्ठेने काम केल्याचे तरटे यांनी नमूद केलं आहे.