नवी दिल्ली : कर्नाटकात तब्बल 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसला बहुमत मिळाले, त्यानंतर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. दोघांपैकी कुणाच्या हातात राज्याची सत्ता द्यावी यासाठी काँग्रेसमध्ये बैठकांवर बैठका होत आहेत.मात्र तरीही हा तिढा सुटत नसल्याचे दिसत आहे.
कर्नाटकचा निकाल लागून आज चार दिवस झाले आहेत त्यानंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशातच डीके शिवकुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत.
दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. यावेळी शिवकुमार यांनी खर्गेंकडे मुख्यमंत्रीपदाबाबतची भूमिका मांडली. त्यांनी खर्गे यांच्याकडे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच २०१९ मध्ये काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर राज्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्यात मदत केली, असेही डीके शिवकुमार यांनी खर्गेंना सांगितले असल्याची माहीती आहे.
यावेळी ‘सिद्धरामय्या यांनी याआधी कर्नाटकचं मुख्यमंत्रिपद भुषवलं आहे. त्यामुळे यंदा मला संधी देण्यात यावी, अन्यथा मी केवळ एक सामान्य आमदार म्हणून काम करेन, असं डी के शिवकुमार म्हणाले आहेत. डी के शिवकुमार यांच्या या वाक्याने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.