वैद्यकीय उपकरण निर्मितीसाठी आता “मेक इन इंडिया’

उद्योजकांसाठी पायाभूत सुविधांकरिता केंद्र करणार मदत

पुणे – दरवर्षी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणांची आयात होते ती कमी करण्यासाठी देशांतर्गतच या उत्पादनाची निर्मिती व्हावी याकरिता “मेक इन इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय उपकरण पार्क सुरू करण्याची संकल्पना अंमलात येऊ लागली आहे. असे पार्क उभे करण्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी परवानगी मागितलेली आहे. त्यातील 4 राज्यांना केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरण पार्क उभारण्याची परवानगी दिली आहे.

भारतातील जास्त लोकसंख्या आणि आरोग्यविषयक समस्यांमुळे औषधांबरोबरच वैद्यकीय उपकरणांची गरज वाढली आहे. मात्र, जागतिक दर्जाची वैद्यकीय उपकरणे आयात केल्यानंतर ती महाग असतात.

त्यामुळे वैद्यकीय उपचाराचा खर्च वाढतो. ती उपकरणे देशात तयार केली तर आयातीचा खर्च तर, कमी होईलच त्याचबरोबर उपचाराचा खर्चही कमी होईल असे उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठीच आवश्‍यक मानदंड पूर्ण केल्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगण, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये असे पार्क उभारण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

…तर कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होणार
महाराष्ट्रासह गुजरात, उत्तराखंड या राज्यांनीही असे पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या राज्यांनी यासाठी आवश्‍यक मानदंड पूर्ण केल्यानंतर त्यांना परवानगी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. या पार्कमध्ये आवश्‍यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे अशी उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना सामूहिक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. अशा सामूहिक पायाभूत सुविधा पार्क तयार करण्यासाठी केंद्राकडून 25 कोटी रुपयांपर्यंतची मदत मिळते. भारतात या उपकरणांची बाजारपेठ 70 हजार कोटी रुपयांची आहे. त्यामुळे यासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.