सातारा – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना आ. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी उत्तर कोरेगावमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली.
गेल्या महिनाभरातल्या राजकीय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे सरकार गुरुवारी अस्तित्वात आले. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत काही प्रमाणात असंतोष होता. मात्र, अजित पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणे सुलभ झाले.
या सरकारमध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषद सदस्य मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे, गुलाबराव जगताप उपस्थित होते.