पुणे :पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश झाला आणि सुसंस्कृत पुण्याने मुंबई पालिकेला मागे टाकत राज्यातील सर्वाधीक मोठी महापालिका होण्याचा मान पटकवला. पुणे शहर क्षेत्रफळाने मुंबईपेक्षा मोठे झाले. त्याचवेळी पालिकेला विस्तारित कारभार झेपणार नाही, त्यामुळे पिंपरी-चिंचवड प्रमाणेच पूर्व हवेलीतील गावांची मिळून नवी महापालिका स्थापन करावी, असा प्रस्ताव, चर्चा सुरू झाली होती. परंतु, राजकीय सारीपाटावर आखणी करताना राजकीय कारभाऱ्यांनी यामुद्याकडे दुर्लक्ष केले. 2012 मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत 11 गावांसाठीच्या प्रभाग क्र. 42 मधून समाविष्ट गावांसाठी दोन नगरसेवक मिळाले. त्यांच्याकडूनही या गावांसाठी विशेष काही झाले नाही. त्यानंतर 23 गावांचा समावेश झाल्यानंतर 2021च्या महापालिका निवडणुकीची चाहुल लागल्याने प्रभाग वाढतील त्यामुळे या गावांना स्थानिक नवे नगरसेवक मिळतील, अशी आशा समाविष्ट गावातील नागरिकांना होती.
परंतु, या-त्या कारणाने महापालिकेची निवडणूक लांबत गेली. आता, पुन्हा राज्य शासनाने महापालिका निवडणुकीसाठी 2011च्या लोकसंख्येनुसार नव्याने किमान आणि कमाल लोकसंख्येच्या आधारावर नगरसेवकांची संख्या निश्चित केली तर 2017च्या निवडणुकीच्या निकषानुसार चारचा प्रभाग झाल्यास 2017 प्रमाणेच शहरात 42 प्रभाग होणार आहेत. तर, पालिकेत समाविष्ट गावांसाठी केवळ एकच प्रभाग वाढणार आहे. त्यामुळे या गावांसाठी स्थानिक नेतृत्व म्हणून कमीच नगरसेवक असतील. यामुळे पुन्हा एकदा पूर्व हवेलीतील गावांसाठी नवी महापालिकाच असावी, असा सूर निघू लागला आहे. यातून त्या भागातील स्थानिकांना नगरसेवक म्हणून त्या-त्या गावांचा विकास करता येईल. समाविष्ट गावांच्या विकासाचा भार एखादं दुसरा नगरसेवक पेलू शकत नाही, यासाठी स्वतंत्र प्रशासन गरजेचे असल्याचे तसेच राजकीयदृष्ट्या समतोलही साधला जावू शकेल, असा काहीसा सूर प्रभाग रचनेच्या नव्या निर्णयानंतर 23 गावांतून उमटू लागला आहे. पूर्व हवेलीतील समाविष्ट गावांतील लोकप्रतिनिधींमध्ये पुन्हा चर्चेचे धुमारे
गावे समाविष्ट करण्याचा इतिहास
भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात 1997 मध्ये 38 गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2001 मध्ये 15 पूर्ण आणि पाच अंशत: गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात आली, त्यामुळे महापालिका हद्दवाढ 23 गावांपुरती मर्यादित राहिली. तर, त्यातही पाच गावे अंशत: होती. पुन्हा 2012 मध्ये येवलेवाडी गावाचा महापालिका हद्दीत समावेश करण्यात आला तर नव्याने 28 गावे समाविष्टची चर्चा सुरू झाली. अखेर, 2014 मध्ये उर्वरीत आणि नवी अशी एकूण 34 गावे महापालिकेत समाविष्टचा निर्णय जाहीर झाला. तर, 2017 मध्ये फुरसुंगी आणि देवाची उरळी ही गावे पूर्ण आणि अशंत: असलेली नऊ गावे अशा 11 गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली.
पूर्व हवेलीतील चर्चेतील महापालिका…
पूर्व हवेलीतील गावांसाठी नवी महापालिकेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घेऊ असे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2020 मधये म्हंटले होते. त्यावेळी पूर्व हवेलीसाठी नवी महापालिका होण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अशा निर्माण झाली होती. “हडपसर महापालिका’ यावर मोठी राजकीय चर्चाही रंगली होती. नवी महापालिका निर्मितीला धुमारे आले होते. हडपसरसह मांजरी, फुरसुंगी, उरूळीदेवाची, लोणीकाळभोर, थेऊर, वाघोली, वाडेबोल्हाई, केसनंद, आव्हाळवाडी अशी काही गावे महापलिकेच्या कक्षेत आणण्याबाबत चर्चा सुरू होती. परंतु, हा मुद्दा मागे पडला. आता, महापालिकेत समाविष्ट होऊनही गावांचा विकास होत नाही, स्थानिक नेतृत्त्व (नगरसेवक) मिळत नाही या कारणातून पुन्हा नव्या महापालिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शहराचे अवाढव्य क्षेत्रफळ
1997 मध्ये सुमारे 250 चौरस किलोमीटर
2017 मध्ये 331.57 चौरस किलोमीटर