मित्राचा खून करुन बचावासाठी बनाव; 12 तासांतच पोलिसांनी लावला छडा

पुणे – मद्यपानानंतर पैशांच्या वादातून मित्रानेच युवकाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी रात्री डेंगळे पुलाजवळ घडली होती. त्यानंतर पोलिसांना संशय येऊ नये, आरोपीने मृताच्या घरी गोंधळ केला. तसेच मित्राने उधार घेतलेले पैसे न देता फसवणूक केल्याची तक्रार पोलीस चौकीत केली. मात्र, पोलिसांनी अवघ्या बारा तासांत सुतावरून स्वर्ग गाठत खुनाचा छडा लावत आरोपीला अटक केली.
अब्दुल्ला उर्फ बबलू इलियास सरदार (वय 36 रा.बुधवार पेठ पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सद्दाम उर्फ इस्माईल शेख (25, दोघेही रा. बुधवार पेठ) याचा खून झाला आहे. सरदार याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे असून, बुधवार पेठेत वास्तव्यास होते. दोन दिवसांपूर्वी सद्दामने बबलूकडून मोबाइलसाठी पैसे उधार घेतले होते.
मात्र, त्याला सद्दाम हा बुधवार पेठेतील एका वेश्येसोबत दिसला. त्यावर मोबाइलसाठी दिलेले पैसे सद्दाम असेच उडवत असल्याचा बबलूला राग आला. सोमवारी सायंकाळी बबलूने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तेथून दोघे दारू पिण्यासाठी डेंगळे पुलाखाली आहे. तेथे त्यांच्यात वाद झाले आणि बबलूने सद्दामचा खून केला.
….असा लागडा छडा
पोलिसांना घटनास्थळी सद्दामचा मोबाइल मिळाला. त्या तपासात एक नंबर बबलूचा होता. पोलिसांनी त्यावर फोन केला. तेव्हा बबलूने “माझे पैसे कधी देणार?’ अशी विचारणा केली. यावर सद्दाम जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर बबलूला गाठून चौकशी केली असता, त्याने मद्यप्राशनानंतर सद्दाम कोठे गेला हे माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, दोघेही बारबाहेर पडताना दिसले. यावेळी बबलूच्या अंगावर गुलाबी शर्ट होता. पुढील तपासात पोलिसांनी बबलूला शर्टबद्दल विचारणा केली. तेव्हा त्याने घटनेदिवशी काळ्या-पिवळ्या रंगाचा शर्ट घातल्याचे सांगितले. पण, पोलिसांनी सीसीटीव्ही दाखवताच त्याला घाम फुटला आणि त्याने खुनाची कबुली दिली. तपास पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर यांच्या पथकाने तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या.





